मुंबई : जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीची सिंगल डोस लसीला भारतात आतात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. तर आता ही लस कधी मिळणार असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. तर यावर कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.
कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र भारतात ही लस वितरणासाठी कधी येईल हे आत्ताच जाहीर करणं खूप घाईचं ठरेल.
दरम्यान शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलं होतं. ते म्हणाले होते, भारताने आपलं व्हॅक्सिन बास्केटची व्याप्ती वाढवली आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना लसीला भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधात 5 लसींना परवानगी मिळालेली आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे.
भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस आहे. शिवाय दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजूरीसाठीचा प्रस्ताव पाठवला होता. या कंपनीच्या दाव्याप्रमाणे या लसीचा केवळ एकच डोस प्रभावी आहे. कोरोनावर जॉन्सन अॅन्ड जॉन्सन लस 85 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.