Maharashtra Weather News : देशभरात सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि त्याचे परिणाम वगळता उर्वरित भारतामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांसह अगदी मध्य प्रदेश, दिल्ली , राजस्थान आणि पूर्वोत्तर राज्यांमध्येसुद्धा गारठा वाढत आहे. काश्मीर आणि लडाखमध्ये पर्वतारांगांपासून विविध 'पास' बर्फानं अच्छादले असून, तिथून कोरडे आणि तीव्र शीत वारे मध्य भारताच्या दिशेनं वेगानं वाहत असल्यामुळं महाराष्ट्रातही थंडीचा जबर कडाका अनुभवायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील थंडीचा आढावा घ्यायचा झाल्यास इथं किमान तापमानात काहीशी वाढ झाल्यामुळं बोचऱ्या थंडीचं रुप आता गुलाबी थंडीनं घेतलं आहे. तापमानात अंशत: वाढ असली तरीही गारठा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित आहे.
कोकण किनारपट्टीवर थंडीचा प्रभाव कमी झाला असला तरीही इथं दिवस मावळतीला गेल्यावर मात्र हवेत गारठा जाणवत आहे. तर, विदर्भामध्ये मात्र काही जिल्ह्यांचं तापमान अद्यापही वाढलेलं नाही. त्यामुळं राज्यात थंडी आणि अधूनमधून या गारठ्यातून मिळणारा दिलासा असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या निफाड, धुळे, जळगाव, अहिल्यानगर इथं हवेत गारवा जाणवत असून, उर्वरित भागांमध्ये पारा 10 अंशांच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. धुक्याची चादर मात्र पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रावर कायम असून, इथं दिवसा आणि रात्रीही दृश्यमानतेवर काही अंशी परिणाम होताना दिसत आहे.