Long Covid: कोरोनामुक्त झाल्यानंतरही पाठ सोडत नाहीये कोरोना

बरं झाल्यावरही काहींना अजून कोरोनाच्या साईड इफेक्टसना सामोरं जावं लागतंय.

Updated: Jan 21, 2022, 08:09 AM IST
Long Covid: कोरोनामुक्त झाल्यानंतरही पाठ सोडत नाहीये कोरोना title=

मुंबई : जवळपास गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या देशभरात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेकजण ओढले गेलेत. यामधून काही लोकं लवकर बरे झाले. मात्र असं असूनही काहींना अजून कोरोनाच्या साईड इफेक्टसना सामोरं जावं लागतंय.

तज्ज्ञांच्या मते, कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेक आठवडे कोरोना व्हायरसच्या दिसणाऱ्या प्रभावाला लाँग कोविड म्हणतात. ही स्थिती रुग्णामध्ये आठवडे ते महिने टिकू शकते. या दरम्यान, त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक परिणाम होऊ शकतात.

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील लाँग कोविडला कारणीभूत ठरू शकतो. यामध्ये कोरोना चाचणी केल्यानंतर रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल. परंतु असं असूनही, दीर्घकाळापर्यंत कोविडची गंभीर लक्षणं कायम राहू शकतात. याचा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

वृद्ध आणि आजारी लोकांना जास्त धोका

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, लाँग कोविडची लक्षणं कोणत्याही रुग्णामध्ये दिसू शकतात. आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये आणि वृद्धांमध्ये, हा धोका  जास्त असू शकतो. या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांना जास्त धोका असू शकतो.

डॉक्टरांच्या मते, लाँग कोविडच्या लक्षणांमध्ये सततचा खोकला, थकवा, चिंता, झोपेची समस्या, सुस्ती, मानसिक थकवा आणि श्वास लागणं यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.