नवी दिल्ली : कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने भारताला इशारा दिला आहे. कोरोना लवकर संपण्याची शक्यता नाही, त्यामुळे भारताला कोरोना संसर्गाला सामोरं जाण्यासाठी, कोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची आवश्यकता असल्याचं, WHOने म्हटलं आहे. कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवण्याचा सल्लाही भारताला देण्यात आला.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये, जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. आणि जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत भारताने खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया भागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितलं की, ज्याप्रकारे जगभरात कोरोनाची स्थिती आहे, ते पाहता कोरोना लवकर नष्ट होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारत सरकारला कोरोनाशी लढा देण्यासाठी तयारी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. या संसर्गातून मुक्त होण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येत कोरोना संक्रमणाचा दर कमी करण्याकडे आणि त्यासोबतच मृत्यू दरही कमी करण्याकडे अधिक लक्ष देण्याचं, सांगण्यात आलं आहे.
डॉ. खेत्रपाल यांनी भारतासह दक्षिण पूर्व आशियाई देशांना सार्वजनिक आरोग्य उपाय, डिटेक्ट, टेस्ट, ट्रेस, आयसोलेट, ट्रीट, हँड हायजीन आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय, कोरोना हॉटस्पॉट चिन्हित करणं, संसर्गग्रस्तांना विलगीकरणात ठेवणं आणि उपचार करण्यावरही भर देण्याचं सांगितलं आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, भारताने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना, तयारीचं WHOने कौतुक केलं आहे. तसंच भारतात कोरोना रुग्ण वाढण्यामागे, देशातील मोठी लोकसंख्या हे कारण असल्याचं WHOने सांगितलं. असं असूनही, भारत सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली, चाचण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही भर दिला, हेच कारण आहे की भारतातील परिस्थिती आज इतर देशांपेक्षा चांगली असल्याचं WHOने सांगितलं.