या कारणांमुळे होते कावीळ, अशी घ्या काळजी

जागतिक कावीळ दिवस

Updated: Jul 28, 2020, 09:44 PM IST

मुंबई : हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. हिपेटायटिस ई हा व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ई हा पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना होतो अशी माहिती चेंबुरच्या झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे पोटविकार तज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली.

फॅटी लिव्हर

यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही फॅटी लिव्हरची परिस्थिती उद्भवते. 'फॅटी लिव्हर' या आजाराचे तीन प्रकार असतात. 

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) : यामध्ये यकृतात फक्त चरबी जमा झालेली असते, पण यकृतावर सूज नसते.

नॉन अल्कोहोलिक स्टीटोहिपॅटायटिस (एनएएसएच) : यामध्ये यकृतावर सूज आढळते आणि यकृत पेशी नष्ट होत असल्याची लक्षणे दिसून येतात.

लिव्हर सिऱ्हॉसिस : यकृतामधील चरबीचे प्रमाण वाढत जाऊन यकृताची इजा वाढते आणि पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन सिऱ्हॉसिस होतो.

कारणे : आहारातील चरबीचे योग्यरीत्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात साखर, स्निग्ध पदार्थ जास्त असणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे हालचालींचा, व्यायामाचा अभाव असणे ही यामागची कारणे आहेत. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड, इतर हार्मोन्सची कमतरता, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसेराइड्सचे रक्तातील वाढते प्रमाण यामुळेसुद्धा यकृतातील चरबी वाढते.

प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते. मधुमेहाच्या ७० ते ८० टक्के रुग्णांना फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो. बॉडी मास इंडेक्सद्वारे (बीएमआय) हा धोका लक्षात येऊ शकतो.

यापूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. बदलती आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरसारख्या फास्टफूडमुळे आज तरुणांमध्ये हा आजार बळावताना दिसत आहे.

बहुतांश स्थूल व्यक्तीमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे सिऱ्हॉसिस वा कॅन्सरचीही भीती असते. साधारणतः सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिऱ्हॉसिस होतो, त्यातील १०-११ टक्के रुग्णांमध्ये ते मृत्यूचे कारण ठरते.