केसांना नैसर्गिकरित्या कंडीशनिंग करतील हे ५ पदार्थ!

केसांचे आरोग्य जपण्यासाठी उत्तम कंडिशनरची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

Updated: Jun 20, 2018, 09:36 AM IST
केसांना नैसर्गिकरित्या कंडीशनिंग करतील हे ५ पदार्थ! title=

मुंबई : केसांचे आरोग्य जपण्यासाठी उत्तम कंडिशनरची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण बाजारातील केमिकल्सयुक्त महागडे कंडिशनर नेहमी फायदेशीर ठरतील असे नाही. या महागड्या कंडिशनर वापरुनही केस कोरडे, निस्तेज होतात. मग या महागड्या कंडिशनरऐवजी हे घरगुती उपाय करुन पहा. त्यामुळे केसांचे कंडिशनर सोपे होईल व केस मुलायम चमकदार होतील. जाणून घ्या कोणते आहेत ते उपाय...

ऑलिव्ह ऑईल

केस खूप कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑईल हा एक उत्तम उपाय आहे. ऑलिव्ह ऑईलने केसांना १५-२० मिनिटे मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवून काही वेळासाठी केसांना गुंडाळून ठेवा. त्यामुळे केसांची चमक टिकून राहील.

अंडे

केसांचे कंडीशनिंग करण्यात अंडे महत्त्वाचे ठरते. एक कप कोमट पाण्यात अंडे फेटून केसांना लावा. १० मिनिटे ठेवा आणि त्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांचे चांगले कंडीशनिंग होईल. केस खूपच कोरडे असतील तर आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

दही

केस मुलायम आणि चमकदार बनवण्याचा दही हा एक चांगला नैसर्गिक उपाय आहे. याशिवाय केसगळती, कोंडा यांसारख्या समस्याही दूर होतात. दही फेटून केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा.

मेंहदी

केसांना रंगवण्यासाठी वापरली जाणारी मेंहदी एक उत्तम कंडीशनर आहे. त्यामुळे केसांना मेंहदी लावल्यानंतर अर्धा तास तसेच ठेवा. त्यानंतर केस धुवा. मेंहदीत थोडी कॉफी पावडर आणि दोन चमचे आवळा पावडर घातल्यास केसांना अधिक चमक येईल व केसांचा रंग टिकून राहील. 

मध

केस खूप कोरडे झाले असल्यास मधात व्हेजिटेबल ऑईल घालून केसांना लावा. ३० मिनिटांनंतर शॅम्पूने धुवा. केस मुलायम होण्याबरोबरच चमकू लागतील.