What is Red Honey: मध... नैसर्गिकरित्या गोडवा असणारा हा एक असा घटक ज्याचा वापर अनेक कारणांनी दैनंदिन जीवनात केला जातो. म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी मध म्हणजे साखरेचा एक उत्तम पर्याय. तर, काहींसाठी जेवणात एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा घटक म्हणजेही मध. वैद्यकिय गुणधर्मामुळं या मधाला आयुर्वेदातही महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे. पम, तुम्हाला माहितीये का एक अशा प्रकारचं मधही आहे जे सध्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. (Benefits of honey)
जगभरात या मधाची चर्चाच जास्त होते, कारण असं म्हणतात की त्यामुळं मद्याहून जास्त नशा होते. जगातील सर्वात मोठ्या मधमाश्या हे मध तयार करतात. या मधमाशांच्या प्रजातीला हिमालयन क्लिफ मधमाशी म्हणूनही ओळखलं जातं.
लाल मध तयार करण्यासाठी या मधमाशा (हिमालयन क्लिफ मधमाशा) विषारी फळांमधून रस घेतात आणि तो मधांच्या पोळ्यांमध्ये साठवू लागतात. असं म्हणतात की या मधामुळं प्रचंड नशा होते. शिवाय त्यामध्ये असंख्य औषधी गुणधर्मही असतात. याच कारणामुळं जगभरातून या मधाला मोठी मागणी आहे. मधुमेह, रक्तदाह नियंत्रणात ठेवण्यासाठी या मधाचं सेवन फायद्याचं ठरतं. सध्या मात्र या मधाची मागणी त्याच्या नशा होण्याच्या गुणधर्मामुळं सर्वाधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
असं म्हणतात की या लाल मधाची नशा एब्सिन्थेसारखीच असते. एब्सिन्थे हा एक असा पदार्थ आहे ज्यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे लाल मधाचं प्रमाणाहून जास्त सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो.
नेपाळच्या दुर्गम भागांमध्ये लाल मधाचे पोळे आढळून येतात. पोळ्यातून हे मध काढण्याचं कामही तितक्याच जिकीरीचं. सर्वसामान्य मधाच्या पोळ्यातून मध काढण्यापेक्षा या लाल मधाचं पोळं फोडण्याची प्रक्रिया अतिशय कठीण असते. सहसा हे काम गुरुंग या आदिवासी जमातीतीद्वारे केलं जातं. या प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती दोरखंडाच्या मदतीनं अनेक फूटांची उंच चढाई करतो. ज्यानंतर धुराच्या मदतीनं पोळ्यावरील मधमाशांना हटवलं जातं. हे करत असताना मध काढणाऱ्या व्यक्तीला मधमाशीचा डंकही सोसावा लागतो. अशा या मधाला जागतिक स्तरावर मोठी किंमत मिळते. त्यामुळं भविष्यात कधी अस्सल लाल मध पाहण्याचा किंवा खरेदी करण्याचा योग आला तर ही संधी चुकवू नका.