कोरोनापासून वाचण्यासाठी हृदयरोगींनी अशी घ्या काळजी

अनेक वर्षांपासून हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झालेली असते.

Updated: May 16, 2020, 09:43 AM IST
कोरोनापासून वाचण्यासाठी हृदयरोगींनी अशी घ्या काळजी

मुंबई : चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने जगभरात एकच थैमान घातले आहे. भारतातही या ‘कोविड-१९’ आजाराने पसरायला सुरूवात केली आहे. या रूग्णांची वाढती संख्या पाहता देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने कोणत्याही वयातील व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे, मधुमेही-हदयरोगींनी मात्र अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्य असल्याचे मत वोक्हार्ट रूग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. का अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी असते आणि त्यामुळे त्यांना जर अशा प्रकारच्या विषाणुची लागण झाल्यास त्यामुळे गुंतागुत वाढू शकते आणि आजाराची गंभीरता वाढू शकते.

कोरोनाचा सर्वांधिक धोका

जागतिक संशोधनानुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती आणि हृदयाचा दिर्घकालीन गंभीर आजार असणाऱ्यांना कोरोना व्हायरसचा धोका सर्वाधिक आहे. याशिवाय हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णाला या विषाणूचा संसर्ग पटकन होऊ शकतो. त्यामुळे या रूग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे.

गर्भवती महिला किंवा तिला कोणत्याही प्रकारचा हृदयविकार असेल तर

७० वर्षांपेक्षा जास्त वय आणि त्यातही त्या व्यक्तीला हदयरोग असेल तर

एखाद्याला एनजाइना असल्यास(छातीत दुखण्याचा एक प्रकार हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहामुळे होतो), हृदयाच्या झ़डपांचा आजार आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी दोष असणाऱ्यांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका अधिक असतो.

तथ्य जाणून घ्याः-

हदयविकार असणाऱ्या रूग्णांसाठी असलेल्या एसीई इनहिबिटरस आणि एआरबी ही औषध आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, हे चुकीचं आहे. यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. हृदयरोगींनी भितीपायी या औषधांचे सेवन करणे थांबवू नयेत.
 
कोरोना होऊ नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रूग्णांना देण्यात येणारी काही औषध ही सामान्य वापरासाठी नसतात. विनाकारण या औषधांचे सेवन केल्यास हृदयावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारकारक शक्ती वाढवणारी औषध डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेऊ नयेत.

हदयरोगींना कोरोना व्हायरस धोकादायक 

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लागण झाल्यास संपूर्ण शरीरात जळजळ होण्याची शक्यता असते. या संसर्गाचा परिणाम हृदयावर होत असल्याने गंभीर परिणाम दिसून लागतात. याशिवाय हृदयाच्या ठोक्याचे कार्य ही असंतुलित होते.

अनेक वर्षांपासून हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झालेली असते. अशा स्थितीत फ्लू किंवा कोरोना व्हायरसची लागण झाल्यास या विषाणूशी लढा देण्यास रूग्णाचे शरीर अपयशी ठरते. त्यात ताप येणे, भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीर साथ देत नसल्याने रूग्णाची प्रकृती अधिकच खालावते.

अशी घ्या काळजी 

सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाणे शक्यतो टाळावे
स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत
खोकताना आणि शिंकताना तोंड झाकून घ्या.
शिंकताना किंवा खोकला असताना वापरलेल्या ऊतींचे विल्हेवाट लावा.
वैयक्तिक कचरा किंवा कपड्याचा वापर केल्यानंतर तो कचऱ्याच्या पिशवीत योग्यरित्या टाकून द्याव्यात.
नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करा
आहारात ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असावा
उन्हाळ्यात अधिकाधिक पाण्याचे सेवन करा
पाहुण्यांना घरी बोलावू नका
नातेवाईकांशी फोनच्या माध्यमातून संवाद साधा
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवा
आवश्यक औषधांचा साठा करा आणि नियमितपणे घ्या.