कडक उन्हाळ्यात स्वत:ची अशी घ्या काळजी !

याची माहिती नसल्यामुळे अनेकांची गडबड होते.

Updated: Apr 22, 2019, 12:30 PM IST
 कडक उन्हाळ्यात स्वत:ची अशी घ्या काळजी ! title=

मुंबई:  थंडीचे वातावरण कमी होऊन आता उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात घराबाहेर पडायचा विचार झाला की, कंटाळा येतो. वाढलेल्या उष्णतेमुळे काही आजार लागण्याची शक्यता वर्तवली जाते. डॉक्टरांकडूनही उन्हाळ्यात स्वत:ची काळजी घ्या, असा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात काय करावे? कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत? याची माहिती नसल्यामुळे अनेकांची गडबड होते. अशात निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मिळाल्या तर यापेक्षा दिलासादायक गोष्टच दुसरी नाही.

 

- काय करावे?

१) सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. यामुळे डोकं आणि डोळ्यांना कमी त्रास जाणवतो. 

२) सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदूळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.  

३) सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची चप्पल वापरु नयेत. 

४) कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊनच घराबाहेर पडावे. डोकं आणि डोळ्यांचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा.

५) फ्रिज किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायचे टाळा. यामुळे घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साधं अथवा माठातील पाणी पिणे उत्तम आहे. 

६) जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेहंदी लावावी.

- हे करणे टाळा 

१) लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

२) गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत घराबाहेर जाणे टाळावे.

३) खमंग, कोरडं, शिळं, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसंच आमचूर, लोणचं, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ खाऊ नये.

४) कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावं. 

५) उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 10-15 मिनिटांनंतरच पाणी प्यावं. 

६) अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणं आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.