मुंबई : कोरोनावर उपचार करण्यासाठी विविध औषधं तसंच अभ्यास करण्यात आलेत. तर आता कोरोनाच्या उपचारांसंदर्भात एक नवीन दावा करण्यात आला आहे. या दाव्यानुसार, कोरोना व्हायरसच्या विरोधात नायट्रिक ऑक्साइड (Nitric oxide) यशस्वी आणि आर्थिक दृष्ट्याही किफायतीशीर असल्याचं समोर आलं आहे. कोचीनच्या अमृता रूग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांद्वारे केलेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे की, नायट्रिक ऑक्साइडचा वास घेतल्याने कोरोनाच्या व्हायरसला नाकातच मारण्यास मदत मिळू शकते. हे संशोधन इंफेक्शियस माइक्रोब्स अँड डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
संशोधकांना अभ्यासात असं आढळलं की, नायट्रिक ऑक्साईड कोरोना व्हायरसला मारू शकतो.
ब्लू बेबी सिंड्रोम आणि फुफ्फुस तसंच हृदय प्रत्यारोपणाचे रूग्ण यांसारख्या वैद्यकीय परिस्थितीने ग्रासलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडचा वापर केला जातो.
एका बातमीनुसार, अमृता स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेसर बिपिन नायर चाचण्यांबद्दल बोलताना म्हणाले की, नायट्रिक ऑक्साईडला कोरोनासाठी पर्यायी उपचार म्हणून पाहिलं पाहिजं.
बिपीन नायर म्हणाले, एका स्वीडिश गटाने केलेल्या अभ्यासातून आम्हाला ही कल्पना मिळाली. या संशोधनात असं सुचवलेलं की, हा वायू SARS-Co-2 व्हायरसला रोखण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो. कारण ते व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनवर थेट परिणाम करणारे बायोकेमिकल बदल घडवून आणतात.
अमृता रूग्णालयाच्या टीमने रुग्णांच्या छोट्या ग्रुपवर या टेस्ट केल्या होत्या. यासाठी निवडलेल्या 25 रूग्णांपैकी, 14 रूग्णांना स्टँण्डर्ड ट्रीटमेंट सोबत iNO थेरपी देण्यात आली. या चाचणीचे अहवाल पाहिले असता iNO थेरपी घेत असलेल्या रुग्णांमध्ये व्हायरल लोड बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसून आला.