मुंबई : देशात ओमायक्रॉनचे रूग्णही वाढतायत. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा हा व्हेरिएंट जलद गतीने पसरणारा आहे. दरम्यान ओमायक्रॉनची लागण झालेल्या अनेक रूग्णांना थंडी लागत असल्याचं समोर आलं आहे. त्यासोबत घशात खवखव, नाक वाहणं आणि डोकेदुखी ही लक्षणं दिसून येतायत.
ओमायक्रॉनचा प्रसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत खूप वेगाने होतो. तुम्हाला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे की नाही, हे आरटी-पीसीआर चाचणीच्या माध्यामातून समजतं. यामध्ये, व्यक्तीचा नमुना पॅथोलॉजी लॅबमध्ये पाठवला जातो. यानुसार संसर्ग ओमायक्रॉन, डेल्टा किंवा इतर कशामुळे हे समजण्यास मदत होते.
जर तुम्हाला केवळ कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे समजून घेण्यासाठी रॅपिड टेस्ट केली जाते. मात्र या माध्यमातून तुम्हाला व्हेरिएंटची माहिती मिळू शकणार नाहीये. ओमायक्रॉन व्हेरिएंटसाठी जीनोम सिक्वेंसिंग आवश्यक आहे, ज्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात.
व्हायरसचं सतत म्यूटेशन होतं म्हणजे व्हायरस रूप बदलतं. यालाच व्हेरिएंट असं म्हणतात. यातील काही व्हेरिएंट अधिक धोकादायक असू शकतात किंवा ते खूप वेगाने पसरू शकतात. हे व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (VoC) म्हणजेच चिंतेची बाब म्हणून ओळखले जातात.
ओमायक्रॉन देखील व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. यामध्ये असे बदल झाले आहेत जे यापूर्वी कधीही दिसून आले नाहीत. बहुतेक बदल व्हायरसच्या त्या भागांमध्ये झाले आहेत जिथे सध्या लस काम करते. व्हायरसच्या या भागाला स्पाइक प्रोटीन म्हटलं जातं.