क्रेडीटकार्डचे बिल अव्वाच्या सव्वा होण्याची ५ कारणे

ही कारणं लक्षात ठेवा, तुमचे पैसे नक्की वाचतील.

Updated: Aug 15, 2018, 10:42 PM IST
क्रेडीटकार्डचे बिल अव्वाच्या सव्वा होण्याची ५ कारणे title=

मुंबई : आजकाल क्रेडीट कार्ड ऑफर करणाऱ्या कंपन्यांची, म्हणजेच बँकांची कमी नाही. तुमचा क्रेडीट स्कोर चांगला असेल, तर कंपन्या सहज क्रेडीट कार्ड तुम्हाला देऊ करतात, पण क्रेडीट कार्ड वापरताना काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या विषयी माहिती घेतली नाही, तर तुम्हाला क्रेडीट कार्ड वापरणं चांगलंच महागात पडेल.

अनेक लोक क्रेडीट कार्डचे पैसे नियमित भरत असतात, तरी देखील त्यांना अव्वाच्या सव्वा बिल येत, क्रेडीट कार्डचं पैसे कमी होत नाहीत. पैसे भरूनही बिल तेवढंच का राहतं असं तुम्हाला वाटू लागतं, पण क्रेडीट कार्डचे अनेक छुपे असल्यासारखे काही नियम आहेत, ते लक्षात ठेवा.

१) क्रेडीट कार्डचं बिल जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा ते मिनिमम अमाऊंटचं, म्हणजे कमीत कमी रकमेचं बिल असतं. ते बिल भरल्यानंतरही अनेक वेळा तुमची मूळ रक्कम तशीच राहते. यासाठी जर तुम्हाला मिनिमम अमाऊंट ८ हजार भरण्यास सांगितली असेल, तर १० हजार भरा, किंवा त्यापेक्षा जास्त भरत हा आकडा कमी करत राहा. तुमचं क्रेडीट कार्डचं कर्ज वेगाने कमी होईल.

२) क्रेडीट कार्डचं बिल मुदतीच्या आत भरा. कारण क्रेडीट कार्डची लेट फी खूप जास्त असते. कमीत कमी ७०० रूपये आणि इतर गोष्टींसह १३०० रूपये, आणि राहिलेल्या रक्कमेला आणखी व्याज. यामुळे तुमची रक्कम अधिक वाढत असते.

३) क्रेडीट कार्डमधून रोख रक्कम काढणे, टाळाच. रोख रक्कम जर तुम्ही काढली, तर त्याला व्याज ३.३ टक्के असतं. विशेष म्हणजे जर याआधी तुम्ही ४० हजाराची शॉपिंग केली असेल, आणि आणखी १० हजार कॅश काढले, तर जोपर्यंत तुम्ही शॉपिंगचे इएमआय किंवा रोख रकमेत ४० हजार भरत नाहीत, तोपर्यंत या १० हजाराचं व्याज ३.३ या दराने सुरूच राहणार. 

हे थांबवायचं असेल, तर तुम्हाला एकाच वेळेस ५० हजार भरलेले परवडतील, नाहीतर ५० हजार भरेपर्यंत १० हजाराला ३.३ व्याजदर सुरू असेल. कॅश काढल्याचे पैसे क्रेडीट कार्ड कंपनी सर्वात शेवटी जमा करते.

४) क्रेडीट कार्डवर लहान शॉपिंग करणे टाळा, अशा गोष्टी ज्याचा ईएमआय होणार नसेल, २ ते अडीच हजाराच्या खालील वस्तू. कारण अशा गोष्टींचा ईएमआय होत नाही आणि आपण त्या खरेदी करतो, पण यावरील टॅक्स, जीएसटी आणि लहान शॉपिंग आहे म्हणून दुर्लक्ष झालं तर हे बिल देखील अव्वाच्या सव्वा होतं.

५) रेल्वेची ईएमआय ने होणारी लहान तिकीट क्रेडीट कार्डने बूक करणे टाळा, ही बिलं दुर्लक्षित होतात, आणि त्याचा फायदा बिल वाढल्यानंतर क्रेडीट कार्ड कंपनीलाच होतो.