मुंबई : आजकाल तणावग्रस्त आणि धकाधकीच्या होत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका बळावला आहे. तरूण मुली आणि स्त्रियांमध्ये वाढणारा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रासही बळावत चालला आहे. या त्रासामुळे केवळ स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आलेले नाही मात्र सोबतीने बाळाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.
पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम असणार्या स्त्रियांच्या बाळांमध्ये ऑटिझम बळावण्याचा धोका अधिक असतो. एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, पॉलिसिस्टिक ऑवरी सिंड्रोम हा टेस्टोस्टेरोनच्या वाढलेल्या पातळीमुळे होणारा आजार आहे.
पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोममध्ये सुरूवातीच्या काळात मासिकपाळीत अनियमितता वाढते. अंगावर अनावश्यक केस वाढतात. काही अभ्यासानुसार, ऑटिस्टिक मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन सोबत सेक्स स्टिरॉईडच्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.
आईच्या शरीरामध्ये हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅब्रिजच्या अॅन्ड्रियाना चेरस्कोवने दिलेल्या माहितीनुसार, ऑटिझम हा केवळ जीन्समध्ये संतुलन बिघडल्याने नव्हे तर टेस्टोस्टेरोन सारख्या सेक्स हार्मोनचं संतुलन बिघडल्यानेही होऊ शकतो. संशोधकांनी याकरिता पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोमग्रस्त 8588 महिलांवर अभ्यास केला. हा अहवाल 'ट्रांसलेशनल सायक्रियाट्री'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.