MTNLच्या टार्गेटपेक्षा कर्मचाऱ्यांकडून अधिक VRS अर्ज

एमटीएनएलवर जवळपास १९ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

Updated: Nov 26, 2019, 02:09 PM IST
MTNLच्या टार्गेटपेक्षा कर्मचाऱ्यांकडून अधिक VRS अर्ज
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे (एमटीएनएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुमार यांनी सोमवारी सांगितलं की, ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना अर्थात व्हिआरएसअंतर्गत १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांचं लक्ष्य पार करण्यात आलं आहे. अशाप्रकारे व्हिआरएस अंतर्गत अर्जदारांची संख्या १४ हजार ५०० पर्यंत पोहण्याची शक्यता आहे. 

सुनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमटीएनएलच्या जवळपास १३ हजार ९८८ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत व्हिआरएससाठी अर्ज केले आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या १८ हजार २०० इतकी आहे. ज्यापैकी १६ हजार ३७२ व्हिआरएससाठी पात्र असल्याचं त्यांनी सांगितलं. या व्हिआरएस अर्जांमध्ये आणखी ५०० कर्मचारी सामिल होण्याची शक्यता असून अर्जदारांची संख्या १४ हजार ५०० होऊ शकते. आमचं लक्ष्य १३ हजार ५०० व्हिआरएस अर्ज असल्याचं ते म्हणाले.

व्हिआरएसच्या घोषणेनंतर  १५०० कर्मचारी आधीच सेवानिवृत्त झाले आहेत. एमटीएनएलच्या शेयरची किंमत सध्या नऊ रुपये प्रति शेयर असल्याचं कुमार यांनी सांगितलं. 

कंपनीचे सर्व नियमित व स्थायी कर्मचारी, ज्यांना ३१ जानेवारी २०२० पर्यंत ५० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते या योजनेसाठी पात्र असल्याची माहिती मिळत आहे. 

  

एमटीएनएलवर जवळपास १९ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलमध्ये सुधारणा करण्यासाठी ६९ हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची मंजुरी दिली आहे.