विषारी दारुने घेतला १५७ शेतमजूरांचा बळी; ३०० जणांवर उपचार सुरु

आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Updated: Feb 26, 2019, 12:35 PM IST
विषारी दारुने घेतला १५७ शेतमजूरांचा बळी; ३०० जणांवर उपचार सुरु title=

आसाम: हातभट्टीतील विषारी दारु प्यायल्यामुळे मृत पावलेल्या नागरिकांची संख्या १५७ वर जाऊन पोहोचली आहे. ३०० जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. याबाबत कसून चौकशी करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच बेकायदा दारुचे जाळे उदध्वस्त करुन टाकण्याचे आदेश सरकारने उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.

या घटनेत मृत पावलेले सर्व जण चहाच्या मळ्यातील कामगार होते. गोलाघाट येथील सलमारा आणि जोरहाटमधील बोरघोला आणि तिताबोर येथील कामगारांचा यात समावेश आहे. गुवाहाटीजवळील गोलाघाट येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी गुरुवारी रात्री सालमोरा टी इस्टेट येथील देशी दारुच्या दुकानातून दारु विकत घेतली होती. दारुचे सेवन केल्यानंतर प्रकृती खालावल्याचे कामगारांना जाणवू लागले. त्यामुळे काही कामगारांना जवळच्या जोरहाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाले. तसेच पुढच्या काही क्षणांतच कामगार मृत पावण्यास सुरुवात झाली.  

विषारी दारु प्यायल्यामुळे गुरुवारपर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला होता. या संख्येत त्यानंतर भर पडली. सध्या हा आकडा १५७ वर जाऊन पोहोचला असून, ३०० जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच विरोधकांनी याबाबत सीबीआय चौकशी करा, अशी मागणी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.