मुंबई : परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फ्रान्ससह आता एकूण 16 युरोपियन देशांनी अॅस्ट्राझेनेकाच्या भारतात तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या लसीला मान्यता दिली आहे. यापूर्वी या लसीला मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र कोव्हिशिल्डला परवानगी मिळाल्याने व्हिसा मिळण्यात अडचणी येणार नाहीयेत.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पूनावाला त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, "प्रवाश्यांसाठी ही खरोखर चांगली बातमी आहे कारण 16 युरोपियन देशांनी कोव्हिशिल्डला प्रवेशासाठी स्वीकार्य लस म्हणून मान्यता दिली आहे. परंतु प्रवास करणार्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण लसीकरण झालं असूनही प्रत्येक देशात प्रवेशासाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वं असू शकतात."
दरम्यान युरोपमधध्ये ग्रीन पास योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये परदेश प्रवासासाठी प्रमाणपत्र दिलं जातं. तर आता 16 देशांनी मान्यता दिल्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परदेश प्रवासासाठी जाता येणार आहे. पण ज्या देशात कोरोनाविरोधात हवाई प्रतिबंध लागू आहेत त्या ठिकाणी जाता येणार नाही.
लसीकरणाचे डिजिटल प्रमाणपत्र आता या देशांमध्ये ग्राह्य़ धरलं जाणार आहे. काही ठिकाणी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं प्रमाणपत्र असेल तरी ते पुरेसं मानण्यात येणार आहे.
तर कोविशिल्डला मान्यता देण्यात आलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, फिनलँड, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलँड, आयर्लंड, लाटविया, नेदरलँड्स, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.