India Richest Salesman Who Earns Rs 32 Crore Daily: तुम्हाला अशा एखाद्या उद्योगपतीबद्दल ठाऊक आहे का जो आधी सेल्समन होता? एकेकाळी सेल्समन असलेल्या या उद्योजकाने सुरु केलेल्या कंपनीचीं आजचं बाजारमूल्य हे तब्बल 20 हजार 830 कोटी रुपये इतकं आहे. आपल्यासारख्या अनेक सर्वसामान्यांसाठी ही व्यक्ती म्हणजे एक प्रेरणास्थान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवणाऱ्या या उद्योजकाचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आज कोट्यवधीचा मालक असलेला हा व्यक्ती एकेकाळी फुटपाथवर पुस्तके विकायचा, दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र आज तो रिअल इस्टेटमधील एक नामावंत नाव आहे.
आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, रिझवान साजन! आता तुम्ही हे नाव भारतात फारच क्वचित ऐकलं असेल पण हे नाव सौदी अरेबियामधील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत नाव आहे. अब्जाधीश होण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही तर कौशल्य हवं असं रिझवान सांगतात. तरुणांना प्रेरणा देण्यासाठी शूट केलेल्या एका रिलमध्ये रिझवान यांनी हे विधान केलं आहे. रिझवान यांचं बालपण आर्थिक चणचणीत गेलं. ते मुंबईमधील चाळीत राहायचे. वडिलांच्या मृत्यूनंतर ते 1981 साली कुवैतला स्थायिक झाले. त्यांनी सेल्समन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी वस्तू विकण्यासंदर्भातील वेगवेगळी कौशल्य याच काळापासून शिकण्यास सुरुवात केली. नंतरच याच गोष्टींचा त्यांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी फार फायदा झाला.
रिझवान यांनी दानूबी ग्रुप (Danube Group) या कंपनीची 1993 साली स्थापना केली. त्यांची कंपनी सध्या बांधकाम क्षेत्रातील कच्चा माल पुरवणारी सौदी अरेबियामधील आघाडीची कंपनी आहे. दानूबी ग्रुप होम डेकोअर क्षेत्रामध्येही कार्यरत आहे. कतारबरोबरच सौदी अरेबिया, बहरीन, ओमान आणि भारतातही रिझवान यांची कंपनी कार्यरत आहे.
रिझवान यांनी आपल्या यशाचं श्रेय 'सेल्समनशीप'ला दिलं आहे. रिझवान आजही स्वत:ला अभिमानाने 'सेल्समन' म्हणतात. "मी फार उत्तम सेल्समन आहे. हीच माझी सर्वोत्तम क्वालिटी आहे," असं रिझवान अगदी अभिमानाने सांगतात. रिझवान यांची वार्षिक कमाई 10 बिलियन द्राम्स इतकी आहे. म्हणजेच ते दिवसाला 32 कोटी रुपये कमवतात.
रिझवान यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर कंपनीचा इतर देशांमध्येही यशस्वीपणे विस्तार केला आहे. त्यांच्या कंपनीचं आजचं मूल्य हे 20 हजार 830 कोटी रुपये इतकं आहे. ते दुबईमधील सर्वात यशस्वी भारतीय उद्योजकांपैकी एक आहेत.