नवी दिल्ली: पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या Karachi Stock Exchange इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर Karachi Stock Exchange इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.
#UPDATE Three terrorists killed at Pakistan Stock Exchange in Karachi: Pakistan media https://t.co/fZfPt7pbv4
— ANI (@ANI) June 29, 2020
मात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरु होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घातले.हे सर्व दहशतवादी पोलिसांचा गणवेश परिधान करुन आले होते. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर Karachi Stock Exchange चा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच कराचीतील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हल्ल्यानंतर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूला असणाऱ्या दरवाजाने बाहेर काढण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दलाने शेअर बाजार इमारत परिसर सील केला आहे. त्याशिवाय या परिसरातील काही इमारतींवर स्नाइपर्सही तैनात केले आहेत.
या घटनेसंदर्भात स्टॉक एक्स्चेंजचे संचालक आबिद अली हबीब यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. त्यांनी म्हटले की, दहशतवादी इमारतीच्या पार्किंगमधून आतमध्ये घुसले आणि त्यांनी समोर येणाऱ्या प्रत्येकावर गोळीबार केला. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून इमारतीत सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे आबिद हली हबीब यांनी सांगितले.