मुंबई : दर दिवशी सातत्यानं बदलणाऱ्या या जगामध्ये आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या या दिवसांमध्ये गुन्ह्यांची परिभाषाही बदलली जात आहे. सध्या देशाला हादरवणारी अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका 80 वर्षीय इसमाला गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये येथे ही घटना घडली, जिथे पोलिसांनी एका 80 वर्षीय व्यक्तीला Digital Rape च्या आरोपाखाली अटक केली. हा व्यक्ती मागी 7 वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीवर डिजिटल रेप करत होता. मॉरिस रायडर म्हणून ओळखल्या जाणार्या या व्यक्तीवर पीडितेसोबत हे असभ्य कृत्य केल्याचा आरोप आहे.
आता 'डिजिटल रेप' म्हणजे काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलचं. तर जाणून घेऊयात काय आहे हा नेमका प्रकार.
काय आहे डिजिटल रेप?
जर एखाद्या पुरुषाने कोणत्या महिलेच्या संमतीशिवाय त्याच्या बोटांनी किंवा अंगठ्याने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला तर त्याला डिजिटल रेप असे संबोधतात. परदेशात डिजिटल रेप हा शब्द विविध प्रसंगी वापरला जातो. सध्या भारतातही या प्रकाराच्या विरोधात कायदा करण्यात आला आहे.
वास्तविक, इंग्रजी शब्दकोशात बोट, अंगठा, पायाचे बोट यांना 'डिजीट' असे संबोधले जाते. म्हणून अशा कृत्याला 'डिजिटल रेप' असे नाव देण्यात आले आहे.
आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि POCSO कायद्याच्या कलम 5 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, या कृत्याचा विरोध केल्याने आरोपी पीडितेला मारहाणही करत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
निर्भया प्रकरणानंतर मिळाला होता कायदेशीर दर्जा
2012 मध्ये भारतात घडलेल्या निर्भया घटनेनंतर बलात्कार कायद्यात अनेक बदल करण्यात आले होते. या बदलांमध्ये डिजिटल रेपचाही समावेश होता. बलात्काराचे गुन्हे कमी करण्यासाठी IPC च्या कलम 376 मध्ये डिजिटल बलात्कार देखील जोडण्यात आला आहे. तरीही देशात डिजिटल रेप या शब्दाचा वापर आणि शिक्षा फारच कमी असल्याचे दिसून येते.
किती वर्षांची होऊ शकते शिक्षा
डिजिटल रेपच्या प्रकरणांमध्ये फारच कमी गुन्हे नोंदवले जातात. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कित्येक लोकांना हा शब्दही माहीत नाही. त्यामुळे बलात्काराच्या कायद्यातही त्याचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर कायद्याद्वारे अशा प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षेची तरतूद दिली आहे.
डिजिटल रेप प्रकरणात गुन्हेगाराला किमान ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर काही प्रकरणांमध्ये, गुन्हेगारास 10 वर्षापर्यंत किंवा जन्मठेपेचीही शिक्षा भोगावी लागू शकते.
70% प्रकरणांमध्ये नातेवाईकच आरोपी
मिळालेल्या अहवालानुसार, डिजिटल रेपच्या 70 टक्के प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडिताचे जवळचे लोक किंवा नातेवाईकचं असतात. यामध्ये चुलत भाऊ, जवळचे मित्र, इतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांचा समावेश आहे.
काही प्रकरणांमध्ये तर पिडीतेचे वडीलही स्वत: गुन्हेगार असतात. त्याचबरोबर 29% प्रकरणांमध्ये, आरोपी हा तिच्या सामाजिक परिचयातून ओळखल्या जाणारा व्यक्ती गुन्हेगार असतो.