Covid-19 : गेल्या १० दिवसांमध्ये देशात ९० हजार जणांना कोरोनाची लागण

नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. 

Updated: Jun 11, 2020, 10:38 AM IST
Covid-19 : गेल्या १० दिवसांमध्ये देशात ९० हजार जणांना कोरोनाची लागण title=

नवी दिल्ली :  देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे १ जूनपासून देशात ९० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अद्यापही कोरोनाचे संकट टळले  नसल्यामुळे नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना व्हायरसच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडलेल्यांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास २.८ लाखांवर पोहोचली आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने इटली आणि स्पेन या दोन देशांना कोरोना संक्रमणात मागे टाकले आहे. ही गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर येत आहे. तर अमेरिका, ब्राझील, रूस, आणि ब्रिटेनमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्येत सतत झपाट्याने वाढ होत आहे. 

न्युज एजेन्सी पीटीआयने जाहीर  केलेल्या अकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ लाख २८६ वर पोहोचली असून ८ हजार ९९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या १.४ लाख आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. बुधवारी महाराष्ट्रात नवे ३ हजार २५४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९४ लाख ४१ वर पोहोचली आहे. शिवाय आतापर्यंत ३ हजार ३४३८ जणांनी आपले प्राण गमावले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४४ हजार ५०० रुग्ण सुखरूप कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १ लाख ३३ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत १ लाख ३५ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.