बॉलिवूड चित्रपट 'विवाह'मध्ये पूनम आणि प्रेम हे पात्र रुग्णालयातच विवाबंधनात अडकताना दाखवण्यात आलं आहे. शाहीद कपूर आणि अमृता राव यांनी या भूमिका निभावल्या होत्या. लग्नाच्या आदल्या दिवशी आगीत भाजलेली पूनम रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही प्रेम तिच्याशीच लग्न करण्याचा अट्टहास करतो हे दृश्य अनेकांना भावलं होतं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये अशीच घटना घडली आहे. येथे एका जोडप्याने रुग्णालयात एकमेकांना हार घालत जन्मगाठ बांधली. दुर्गापूरमध्ये ही घटना घडली आहे. नवरीमुलगी आजारी पडली असता हे लग्न पुढे न ढकण्याचा निर्णय घेत रुग्णालयातच विवाह पार पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरीमुलगी आणि नवऱ्यामुलाच्या कुटुंबीयांन दोन वर्षांपूर्वी लग्न ठरवलं होतं. पण लग्नाच्या दोन दिवस आधी नवरीमुलीच्या पोटात दुखू लागलं. पण लग्नासाठी सर्व नातेवाईक पोहोचले असल्याने लग्न पुढे ढकलण्याची दोन्ही कुटुंबांची इच्छा नव्हती. यामुळे अखेर त्यांनी रुग्णालयातच लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
सुचरिता पात्रा आणि अमित मुखर्जी अशी या जोडप्याची नावं आहेत. लग्न करण्यासाठी अमित दिल्लीहून विमानाने पोहोचला. यानंतर रुग्णालयात डॉक्टर, नर्स यांच्या उपस्थितीत हे लग्न लावण्यात आलं. याआधी त्यांनी रुग्णालयाकडे एका तासासाठी सुचरिताला रुग्णवाहिकेने नेऊ शकतो का यासाठी परवानगी मागितली होती. पण दुर्गापूरच्या लाईफ केअर रुग्णालयाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून विशेष परवानगी मिळाली आणि वॉर्डमध्येच लग्नाचं आयोजन करण्यात आलं. लग्नाला परवानगी दिल्याबद्दल अमित आणि सुचरिता यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाचे आभार मानले आहेत.
याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. एखाद्या जोडप्याने अडचणींवर मात करून अशाप्रकारे लग्न करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिली वेळ नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये गाझियाबादमध्ये असा प्रकार घडला होता. डेंग्यूमुळे लग्नाच्या चार दिवस आधी नवरीमुलगी वैशाली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. यानंतर त्यांनी रुग्णालयातच लग्न केलं होतं. या लग्नाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रिपोर्टनुसार, दोन्ही कुटुंबांना मुहूर्त चुकवायचा नव्हता. यामुळे त्यांनी रुग्णालयातच लग्न लावण्याची योजना आखली होती.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये, एका जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म होण्याच्या काही तास आधी लग्न केलं होतं. पीपल मॅगझिनच्या वृत्तानपसार, सारा आणि ब्रँडन पेरी यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवसांनी लग्न करण्याची योजना आखली. मात्र, 35 आठवड्यांची गरोदर असलेल्या साराला 13 फेब्रुवारीला प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या.
सेंट ल्यूक रुग्णालयाने त्यांची गोष्ट फेसबुकला शेअर केली होती. तिने यावेळी अंगावर बेडशीट परिधान केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसंच टेक्सासमध्येही एक जोडपं रुग्णालयात लग्नाच्या बेडीत अडकलं होतं. नवरामुलगा करोनाशी लढत असताना नवरीमुलीने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.