22 वर्षांनी मुलगा सापडला म्हणून महिला हंबरडा फोडून रडली, पण सत्य समजल्यानंतर सगळेच हादरले

महिलेला 22 वर्षांनी आपला मुलगा सापडल्याने अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन व्हायरल झाला होता. मुलगा साधूच्या रुपात घऱी परतला होता. पण सत्य समोर आल्यानंतर कुटुंब हादरलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं.   

शिवराज यादव | Updated: Feb 11, 2024, 11:14 AM IST
22 वर्षांनी मुलगा सापडला म्हणून महिला हंबरडा फोडून रडली, पण सत्य समजल्यानंतर सगळेच हादरले title=

तब्बल 22 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा साधूच्या रुपात घरी परतल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते. मुलगा शेजारी बसलेला असताना महिला हंबरडा फोडून रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण हा भावनिक क्षण काही वेळातच संपला अन कुटुंबाला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. 

दिल्लीतील निवासी भानुमती सिंग यांना आपला मुलगा परत सापडल्याचं समजलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा मुलगा पिंकू वयाच्या 11 व्या वर्षी घर सोडून गेला होता. जास्त खेळत असल्याने आई ओरडली म्हणून पिंकू 2002 मध्ये घरातून पळून गेला होता. 

गेल्या महिन्यात भानुमती आणि तिचे पती रतिपाल सिंह यांना माहिती मिळाली की एक तपस्वी रतिपालच्या मूळ गावी, अमेठीतील खरौलीला भेट देत आहे आणि त्याच्या शरिरावर एक खूण आहे जी पिंकूच्या शरीरावर होती. त्याच्या नातेवाईकांनी रतिपाल आणि भानुमती यांना खरौली येथे जाण्यास सांगितले. 27 जानेवारीला ते तेथे पोहोचले तेव्हा संन्याशाने आपण खरोखरच त्यांचा मुलगा आहे असं सांगितलं. यानंतर तो संन्यासी भानुमतीकडून भिक्षा मागताना आणि गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यादरम्यान भानुमती यांनी अश्रू अनावर झाले होते. 

पिंकूने त्याला सांगितलं की, त्याने संन्यास घेतला असून आणि झारखंडमधील पारसनाथ मठात परत जावं लागणार आहे.. तो म्हणाला की त्याच्या गुरूंनी त्याला सांगितले होतं की त्याने अयोध्येला भेट दिल्यानंतरच आपली दीक्षा पूर्ण होईल आणि नंतर आपल्या कुटुंबीयांकडून भिक्षा घेतली जाईल.

सुरुवातीला त्यांनी पिंकूला परत जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत नकार दिला. पण नंतर तो आता वेगळ्या मार्गावर आहे, हे लक्षात घेत त्याला मदत केली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन 13 क्विंटल धान्य भिक्षा म्हणून दिले आणि रतिपालच्या बहिणीनेही त्याला 11,000 रुपये दिले. रतिपालने पिंकूला फोन विकत घेऊन दिला आणि संपर्कात राहण्यास सांगितलं. पिंकू 1 फेब्रुवारीला गाव सोडून गेला.

पोलीस ठाण्यात तक्रार

पिंकू परत गेल्यानंतर रतिपालला फोन करु लागला. आपल्याला परत यायचं आहे, पण मठातील लोक 10 लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाहीत असं सांगत असल्याचा दावा केला. पुन्हा कौटुंबिक आयुष्य जगण्यासाठी संन्यासाला हे पैसे द्यावे लागतात असं त्याने सांगितलं होतं. मुलगा परत हवा असल्याने रतिपालने आपली जमीन 11 लाख 20 हजारांत विकली. नंतर त्याने पिंकूला आपण झारखंडला येऊन मठात पैसे देत असल्याचं सांगितलं.
 
पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पिंकूने रतिपाल यांना झारखंडला येण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळी कारणं दिली. आपल्याला बँक ट्रान्सफर आणि युपीआय अॅपच्या माध्यमातून हे पैसे पाठवा असं तो सांगू लागला. यानंतर रतिपाल यांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता झारखंडमध्ये पारसनाथ मठ नावाचा कोणताच मठ नसल्याचं उघड झालं. 

यानंतर रतिपाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांना पिंकू असल्याचा दावा करणारा हा प्रत्यक्षात गोंडा गावातील नफीस नावाचा व्यक्ती होता, जो जो कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती मिळाली. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

आरोपींची मोडस ऑपरेंडी

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, नफीसचा भाऊ रशीद याने जुलै 2021 मध्ये तपस्वी असल्याचा बनाव करत कुटुंबाची लाखोंची फसवणूक केली होती. बुधीराम विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीचा मुलगा रवी हा सहसपुरा गावातून बेपत्ता झाला होता. वर्षापूर्वी आणि रशीद तपस्वी असल्याचे भासवत गावात पोहोचला होता. त्याने रवी असल्याचा दावा केला आणि बुधीरामच्या पत्नीकडे भिक्षा मागितली.

कुटुंबीयांनी रशीदला रवी समजून त्यांच्यासोबत राहण्यास दिलं. नंतर लाखोंची रोकड घेऊन तो फरार झाला. अटक केल्यानंतर त्याची खरी ओळख समोर आली होती.

रशीद सहसपुरा गावात पोहोचण्याच्या काही दिवस आधी, नफीसचा एक नातेवाईक वाराणसीच्या हाजीपूर गावात कल्लू राजभरच्या घरी आला. एका तपस्वीच्या पोशाखात, त्याने कल्लूचा मुलगा असल्याचे भासवले, जो 15 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता.