कोलकाता - व्हर्जिन मुली या शीतपेयाच्या सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असे बिनडोक विधान करणाऱ्या जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापक कनक सरकार यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध विषय शिकवणारे प्राध्यापक इतके खालच्या स्तराचे वक्तव्य कसे काय करू शकतात, असा प्रश्नही विचारण्यात येऊ लागला आहे. ज्या मुलांना आपली होणारी पत्नी व्हर्जिन आहे की नाही हे माहिती नसते, ते मूर्ख असतात. व्हर्जिन पत्नी एखाद्या परीसारखीच असते, असेही त्यांनी म्हटले आहे. फेसबुकवर ही पोस्ट प्रसिद्ध केल्यानंतर सरकार यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपली पोस्ट फेसबुकवरून काढून टाकली. त्याचवेळी आपण आपल्या मतांवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे, असे सरकार यांनी म्हटले आहे.
जर एखाद्याला शीतपेयाची बाटली हवी असेल तर तो सील उघडलेली बाटली कशाला घेईल. किंवा एखाद्याला बिस्किटाचा पुडा हवा असेल, तर तो फुटलेला पुडा कशाला विकत घेईल असा प्रश्न विचारत सरकार यांनी स्वतःच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे. जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो, त्यावेळीच ती सीलबंद असते. व्हर्जिन मुलगी म्हणजे संस्कृती, मुल्ये यांची जपणूक असते. त्याचबरोबर लैंगिक शुद्धतेचाही तो भाग असतो, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते. अनेक मुलांसाठी व्हर्जिन मुलगी म्हणजे एखाद्या परीसारखीच असते, असे सरकार यांनी म्हटले. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी सरकार यांच्यावर टीका केली.
त्यानंतर त्यांनी आपली मूळ पोस्ट फेसबुकवरून काढून टाकली. पण आपल्या आधीच्या पोस्टचे समर्थन करण्यासाठी त्यांनी एक नवी पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुनरुच्चार केला. मी कोणाच्याही विरोधात पोस्ट लिहिलेली नाही. केवळ माझे म्हणणे मांडले आहे, असे त्यांनी नव्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर झाली आणि त्यावर अनेकांनी राग व्यक्त केला.