''मी जेवली नाही, आई जेवण बनवते, ती २ दिवसापासून झोपलीय''...पण आई वारली होती

मानसिक दृष्ट्या कमजोर असलेल्या त्या महिलेला आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाला आहे, हे काही कळले नाही. जेव्हा शेजारच्या माणसांना वास यायला लागला तेव्हा ही गोष्ट उघड झाली.

Updated: May 18, 2021, 01:58 PM IST
''मी जेवली नाही, आई जेवण बनवते, ती २ दिवसापासून झोपलीय''...पण आई वारली होती

बंगळुरु : कोरोना महामारी दरम्यान अनेक लोकांचे प्राण गेले आहेत, तर अनेक धक्कादायक घटना देखील समोर आल्या आहेत, अशीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बंगळूरमधील राजाराजेश्वरी नगरमधून  समोर आली आहे. येथे एक 47 वर्षाची अविवाहित महिला दोन दिवस आपल्या आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ न खाता पिता बसून राहिली. मानसिक दृष्ट्या कमजोर असलेल्या त्या महिलेला आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाला आहे, हे काही कळले नाही. जेव्हा शेजारच्या माणसांना वास यायला लागला तेव्हा ही गोष्ट उघड झाली.

पोलिसांना या बद्दलची माहिती मिळताच ते घटना स्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना खिडकीजवळ हरिश नावाच्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. तर दुसऱ्या खोलीत त्यांना आयार्बा नावाच्या महिलेचा  मृतदेह मिळाला. त्यानंतर त्यांनी श्रीलक्ष्मी नावाच्या महिलेला पाहिलं, ती हरिशची मोठी बहिण असल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान समोर आले.

तिला मानसिक आजार असल्याने आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाला आहे, हे लक्षात आले नाही. नंतर तु काही खाल्लंस का? असा प्रश्न पोलिासांनी श्रीलक्ष्मीला केला असता माझी आईच जेवण बनवते आणि ती दोन दिवसापासून झोपली असल्यामुळे मी जेवले नाही असे तिने सांगितले.

श्रीलक्ष्मीने नंतर पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिच्या भावाची तब्येत खराब झाली होती, ज्यामुळे तिच्या आईने 108 नंबरवर फोन करुन अॅम्बुलन्सला बोलवले होते. त्यानंतर तिची आई देखील अचानक खाली पडली.

पोलिसांनी हरिशचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांनी पाहिले की, त्या मोबाईलवरुन बऱ्याचदा 108 नंबरवर फोन केला होता. आता त्यांचा मृतदेह पॅास्टमोर्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे आणि पोलिस पुढील तपास करत आहेत.