मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तसंच अपहरणकर्त्यांनी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहितीही तक्रारीत दिली. अपहरणकर्त्यांनी त्याला मुलीचे हात-पाय बांधल्याचे काही फोटोही पाठवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राजस्थानमधील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता
पण प्राथमिक तपासात पोलिसांना मुलीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याची शंका आली आहे. "आतापर्यंतच्या तपासात जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरुन तरी मुलीचं अपहरण झालं आहे असं दिसत नाही. पुराव्यांवरुन हा सगळा बनाव असल्याचं दिसत आहे," अशी माहिती कोटाचे पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांनी दिली आहे.
पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, मुलीच्या वडिलांनी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे 18 मार्च रोजी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीची माहिती मिळाल्यावर त्यांनी एक पथक तयार केलं होतं. तपासादरम्यान पथकाला मुलगी आपल्या दोन मैत्रिणींसह इंदोर येथे राहत होती अशी माहिती मिळाली.
पोलिसांनी यानंतर मुलीच्या एका मैत्रिणीची माहिती मिळवली आणि चौकशी केली. यावेळी तिने सांगितलं की, पीडित मुलीला मित्रासह परदेशात जायचं होतं. आपण भारतात शिकू शकत नाही आणि शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे असं ती सांगत होती.
पोलिसांना तपासादरम्यान मागील 6 ते 7 महिन्यांपासून ती कोटात राहत नसल्याची माहिती मिळाली. तिचं एकही लोकेशन कोटामधील नव्हतं. तसंच तिने शहरातील कोणत्याही कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतलेला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने 3 ऑगस्टला तिला कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेऊन दिला होता. 5 ऑगस्टपर्यंत मुलगी तिथेच होती. यानंतर ती मध्य प्रदेशातील इंदोर येथे निघून गेली.
आपण कोचिंग सेंटरमध्ये शिकत आहोत यावर पालकांचा विश्वास बसावा म्हणून मुलीने वेगवेगळ्या नंबरवरून तिच्या परीक्षेतील कामगिरीबद्दल संदेशही पाठवले होते. पण नंतर तिने आणखी एक पाऊल पुढे जात थेट आपल्या अपहरणाचा बनाव रचला. यासाठी तिने आपल्या मैत्रिणीची मदत घेतली. तिने आपले हात, पाय बांधलेले फोटो मैत्रिणीकडून काढून घेतले आणि वडिलांना पाठवले. हे फोटो पाठवल्यानंतर तिनेच वडिलांकडे अपहरण झाल्याचं सांगत 30 लाखांची मागणी केली.
पोलीस अधिक्षकांनी मुलीला घऱी परतण्यासाठी विनंती केली आहे. तसंच जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मदत मागण्याचं आवाहन केलं आहे.