महिलांच्या हक्कांसाठी देशात महिलांचा नवा पक्ष

महिलांना आरक्षण देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी हा पक्ष काम करणार आहे.

Updated: Dec 19, 2018, 06:31 PM IST
महिलांच्या हक्कांसाठी देशात महिलांचा नवा पक्ष title=
Pic Courtesy : PTI

नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. श्वेता शेट्टी यांनी देशातील महिलांसाठी नवीन पक्षाची निर्मिती केली आहे. या पक्षाला राष्ट्रीय महिला पक्ष असे नाव देण्यात आले आहे. तसेच हा पक्ष २०१९ मधील लोकसभेची निवडणूकदेखील लढवणार आहे.  महिलांना आरक्षण देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी हा पक्ष काम करणार आहे. पक्षामध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचा समावेश करण्यात आला आहे.   

पुरुषकेंद्री राजकारणात महिलांच्या स्वतंत्र पक्षाची गरज आहे, अशी घोषणा श्वेता शेट्टी यांनी केली. शे्ट्टी यांनी सांगितले की, देशात असा पक्ष पाहिजे ज्यात केवळ महिलांचा समावेश असणे गरजेचे आहे. महिलांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने हा पक्ष तयार करण्यात आला आहे.

शेट्टी यांनी सांगितले की, केवळ मदर्स डे, महिला दिवस किंवा निवडणुकीवेळी महिलांचे प्रश्न उपस्थित केले जातात. हा पक्ष म्हणजे महिलांसाठी एक वेगळे व्यासपीठ आहे, त्यात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला जाईल. पक्षाने या कार्याची सुरुवात २०१२ पासून केली. लोकसभेच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना ५० टक्के आरक्षण मिळावे या हेतूने हा पक्ष सुरु करण्यात आला आहे. निवडणूक आयोगात नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला आहे.