आपला एक बेजबाबदारपणा किती महाग पडू शकतो याचा प्रत्यय देणारी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे एका महिलेला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. पिस्तूल साफ करत असतानाच अधिकाऱ्याकडून गोळी झाडली गेली. धक्कादायक म्हणजे ही गोळी थेट महिलेच्या डोक्यात जाऊन लागली आणि ती धाडकन खाली पडली. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ सुरु झाली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला तात्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून, प्रृकती नाजूक आहे. दुसरीकडे बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यावर खात्याने कारवाई केली आहे. पोलीस उप-निरीक्षक मनोज शर्मा यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीगडच्या कोतवाली पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. येथे एक महिला पासपोर्ट पडताळणीसाठी आली होती. यादरम्यान ती पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलसमोर उभी होती. यावेळी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याला त्यांची पिस्तूल आणून दिली. अधिकाऱ्याने खटका ओढून पिस्तूल तपासली. मात्र पुढच्याच क्षणी त्यातून गोळी सुटली जी थेट महिलेच्या डोक्यात जाऊन लागली.
Warning: Disturbing visuals
महिला पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आली असता पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी लागून जखमी
A woman who turned up at police station for passport verification caught a bullet to her head from close range fired from pistol of officer pic.twitter.com/oBpfkhZuVS
— Shivraj Yadav | शिवराज यादव (@shiva_shivraj) December 8, 2023
असं काही होईल याचा कोणताच अंदाज नसल्याने पोलीस ठाण्यात धावपळ सुरु झाली. फायरिंगचा आवाज आल्याने सगळेच धावत येतात. तर दुसरीकडे गोळी लागल्याने महिला धाडकन खाली कोसळते. तिच्यासोबत असणाऱ्या तरुणाने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला उचलण्याचा प्रयत्न केला. पण ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यावेळी पोलीस अधिकारीही या घटनामुळे धक्का बसल्याने उभा राहून पाहत होता.
पोलिसांनी जखमी महिलेला तात्काळ जे एन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत एसएसपींनी अधिकारी मनोज शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं आहे. तसंच अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.