शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, रस्त्यावरुन फरफटत नेलं; VIDEO व्हायरल

तामिळनाडूत एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. रविवारी ही घटना घडली होती. पण सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस आली.   

शिवराज यादव | Updated: Aug 30, 2023, 12:44 PM IST
शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, रस्त्यावरुन फरफटत नेलं;  VIDEO व्हायरल title=

तामिळनाडूत (Tamil Nadu) भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. होसूर (Hosur) येथे रविवारी ही घटना घडली. पण सीसीटीव्ही (CCTV) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर घटना उघडकीस आली. मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर सुदैवाने तेथील एका नागरिकाने धाव घेतली आणि तिची सुटका केली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप असून स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत. 

व्हिडीओत मुलगी रस्त्यावरुन चालत जाताना दिसत आहे. यावेळी एक भटका कुत्रा तिच्या रस्त्यात उभा असतो. मुलगी त्या कुत्र्याला हटकवण्याचा प्रयत्न करते. यानंतर तो कुत्रा तिच्यावर तुटून पडतो. यावेळी इतर दोन भटके कुत्रेही तिथे येतात आणि मुलीवर हल्ला करतात. हे तिन्ही श्वान मिळून मुलीला अक्षरश: रस्त्यावर फरफटत होते. यादरम्यान मुलगी आरडाओरडा करत मदतीसाठी याचना करत होती. 

7 वर्षाच्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा कळप तुटून पडला अन् नंतर...; अंगावर शहारे आणणारा VIDEO

 

मुलीचा आरडाओरडा ऐकून तेथील एक व्यक्ती धावत येतो आणि मुलीची सुटका करतो. दरम्यान, श्वानांच्या हल्ल्याने मुलगी भेदरलेली असते. नंतर एक महिलाही येते आणि मुलीला काही लागलं आहे का याची पाहणी करते. यानंतर मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा भटक्या श्वानांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिकांमध्ये रोष असून प्रशासनाने भटक्या श्वानांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. 

उत्तर प्रदेशात 7 वर्षाच्या मुलावर हल्ला

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी एका 7 वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. झांशी (Jhansi) येथे ही घटना घडली. जवळपास पाच कुत्रे एकाचवेळी मुलावर हल्ला करत त्याचे लचके तोडत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. सुदैवाने वेळीच मुलाची आई आणि तेथील स्थानिक धावत आल्याने कुत्र्यांनी पळ काढला. पण हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मुलगा चॉकलेट आणण्यासाठी बाहेर गेला होता. दरम्यान तो घरी परतत असतानाच भटक्या कुत्र्यांचा एक कळप त्याच्यावर तुटून पडला. एकाचवेळी सर्व कुत्र्यांनी हल्ला केल्याने चिमुरडाही हतबल झाला होता. बचाव करताना तो खाली पडला होता. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.