कोलकाता (Kolkata) येथील जाधवपूर विद्यापीठाच्या (Jadavpur University) 17 वर्षीय विद्यार्थाच्या निधनानंतर मोठा वाद निर्माण झाला असून पुन्हा एकदा रॅगिंगची चर्चा सुरु झाली आहे. हॉस्टेलच्या दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडल्याने 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासात विद्यार्थ्याचे कपडे काढून, नग्नावस्थेत कॅम्पसमध्ये परेड काढण्यात आल्याचं समोर आलं आहे.
9 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या मुख्य हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने प्रथम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबाने हॉस्टेलमध्ये रॅगिंग आणि लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणी हॉस्टेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहिीतीनुसार, पीडित विद्यार्थ्याची रॅगिंग करण्यात आली होती. यावेळी त्याचे कपडे काढून परेड काढण्यात आली होती. जवळपास एक तास त्याची रॅगिंग सुरु होती. यावेळी पीडित विद्यार्थी संपूर्ण हॉस्टेलमध्ये दरवाजे वाजवत मदत मागत पळत होता असं तपासात समोर आलं आहे. यादरम्यान विद्यार्थ्यावर समलैंगिक असल्याची टिप्पणीही करण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणी 13 पैकी 12 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांना त्यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडले आहेत. ते पुढे म्हणाले की. पोलीस याप्रकरणी पॉक्सो लागू करण्याचा विचार करत आहेत.
जाधवपूर विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेतील या घटनेनंतर कॅम्पसमधील रॅगिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी सध्याचे नियम पुरेसे आहेत की नाही यावरही चर्चा केली जात आहे.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांना जबाबदार धरलं आहे. विद्यापीठात जे काही घडत आहे त्यासाठी ते 100 टक्के जबाबदार आहेत असं तृणमूल काँग्रेसने म्हटलं आहे.
राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती आहेत. राज्यपालांकडे उच्च पदांवर नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे. दरम्यान, प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज राजभवनात तातडीची बैठक बोलावली होती. तत्पूर्वी, शिक्षण मंत्री ब्रत्य बसू यांच्या '100 टक्के जबाबदार' टिप्पणीला उत्तर देताना राज्यपालांनी म्हटलं की, "मी एक जबाबदार राज्यपाल आहे. जर कोणी ते मान्य केले तर मला खूप आनंद होईल".