एका क्लिकवर आरोग्याची कुंडली! 1 एप्रिलपासून ABHA संदर्भात बदलला 'हा' नियम

Ayushmaan Bharat Yojana: तुम्ही देखील तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड बनवू इच्छित असाल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. 

Updated: Apr 2, 2024, 08:51 PM IST
एका क्लिकवर आरोग्याची कुंडली! 1 एप्रिलपासून ABHA संदर्भात बदलला 'हा' नियम title=
Ayushmaan Bharat Yojana

Ayushmaan Bharat Yojana: अचानक आजारी पडल्यावर अनेकांना आरोग्याची खरी किंमत कळते. दरम्यान अचानक आजारी पडल्यावर आपल्याला आधी कोणते आजार होते?, नक्की कशामुळे त्रास होतोय? असे अनेक प्रश्न डॉक्टर विचारतात. रुग्णाची बोलण्याची स्थिती नसेल आणि नातेवाईकांना याबद्दल माहिती नसेल तर पुढील उपचारासाठीदेखील उशीर होतो. अशावेळी आरोग्य कार्डचे महत्व आपल्याला पटू लागते. आभा हेल्थ कार्ड हे केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणारे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. यामध्ये तुमच्या आरोग्याची कुंडली तुम्हाला पाहायला मिळते. आभा कार्डधारक CGHS लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाची अपडेट दिली आहे. CGHS लाभार्थ्यांना त्यांचे अकाऊंट आपले आभा कार्डसोबत लिंक करणे अनिवार्य केले आहे. 1 एप्रिलपासून हा महत्वपूर्ण नियम लागू झाला आहे. 

CGHS लाभार्थ्यांना 30 दिवसांच्या आत त्यांचे आयडी ABHA ID शी लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आयडी म्हणजेच ABHA आयडी हा एक प्रकारचा हेल्थ डिजिटल रेकॉर्ड आहे. पण यासाठी अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रे लागतील? याची माहिती अनेकांना नसते. याची माहिती घेऊया. प्रत्येकाला ऑनलाइन माध्यमातून स्वत:चे ABHA आयडी बनवता येते. हे एक प्रकारचा डिजिटल आरोग्य रेकॉर्ड असून या योजनेद्वारे भारत सरकार देशातील गरीब लोकांना 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले आहे. 

तुम्ही देखील तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड बनवू इच्छित असाल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे दस्तावेज लागतील. तसेच तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरून तुमच्या डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

हेल्थ कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम हेल्थ आयडी पोर्टल https://healthid.ndhm.gov.in/ वर जा. वेबसाइटवर क्रिएट एबीएचए नंबरवर क्लिक करा. आता मागण्यात आलेली आवश्यक माहिती भरा आणि स्वत:चे कार्ड तयार करा. माहिती भरल्यावर तुमचे कार्ड तयार होईल. आता तुम्ही तुमचे आभा कार्ड पाहू आणि कार्ड डाउनलोड देखील करू शकता.

हेल्थ आयडी कार्डचा फायदा काय?

हेल्थ आयडी कार्डमध्ये तुमच्या आरोग्याची माहिती साठवता येते. हे एक प्रकारे तुमचे आरोग्य पत्रक म्हणून काम करते. तुमचा आरोग्य डेटाबेस त्यात साठवता येतो. डॉक्टर तुमच्या संमतीने या डेटाबेसमध्ये पाहू शकतात. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि अहवाल डेटाबेसमध्ये डिजिटल स्वरूपात साठवले जातात. या प्रणालीद्वारे सर्व रुग्णालये आणि डॉक्टरांची माहितीदेखील हेल्थ कार्डमध्ये साठवली जाते.भारतातील प्रत्येक व्यक्तीला ABHA ID शी जोडण्याची सरकारची योजना आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचा हेल्थ आयडी नंबर फीड करताच तुमची आरोग्य कुंडली पाहता येते. अद्याप अनेकांना याबद्दल माहिती नाही. पण संभाव्य अडचण टाळण्यासाठी तुम्ही देखील लवकरात लवकर आभा कार्ड काढू शकता.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा