Accident : पाच मित्रांनी फिरण्यासाठी नेपाळला (Nepal) जाण्याचा प्लान केला. ठरल्यानुसार पाचही मित्र नेपाळमध्ये पोहोचले. पण त्यांचा तो प्रवास त्यांच्या आयुष्यातला अखेरचा प्रवास ठरला. पाचही मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाला. (Five Freind Died in Nepal) कुटुंबियांना ही घटना कळवण्यात आल्यानंतर त्यांच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मृतदेह आणण्यासाठी पाचही तरुणांचं कुटुंब नेपाळला रवाना झालं आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बिहारमधल्या समस्तीपूर (Bihar Samastipur) इथं राहाणारे पाच मित्र नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पर्यटनाची मजा लुटत असतानाच या पाचही मित्रांवर काळाने घाला घातला. कारमधून प्रवास करत असताना त्यांची कार अनियंत्रित झाली आणि बर्दीवास-काठमांडू रस्त्यावर एका खड्यात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की पाचही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हे पाचही मित्र कल्याणपूर आणि वारिसनगर इथं राहाणारे होते आणि ते काठमांडूला फिरण्यासाठी गेले होते.
अपघाताची माहिती पाचही तरुणांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून ते नेपाळला रवाना झाले आहेत. मृतांमध्ये फुलहरा गावीतर मृत्यूंजय कुमार, भगीरथपुरचा अभिषेक ठाकूर, मथुरापूरचा राजेश कुमार आणि मुकेश कुमार तर कल्याणपूरमधील धर्मेंद्र सोनी यांचा समावेश आहे. अपघाताच्या घटनेनंतर कल्याणपूर आणि वारिसनगर गावावर शोककळा पसरली आहे. हे पाचही तरुण 11 एप्रिलला रस्तेमार्गे कारने काठमांडूला निघाले. नेपाळहून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. यापैकी मृत्यूंजयने जानेवारी नवीन कार खरेदी केली होती. या कारने नेपाळ फिरण्याचा प्लान त्यांनी बनवला होता.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सहा एप्रिलला एका कारचा भीषण अपघात झाला. उर्से टोल नाका परिसरात अवजड वाहन रस्त्याच्या कडेला लावून चालक लघुशंकेसाठी गेला. पण त्याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.