Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.

Updated: Aug 17, 2021, 10:58 AM IST
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि सत्तेची गणितं पुरत बदलली. साऱ्या जगाचं लक्ष सध्या अफगाणिस्तानकडे लागलेलं असतानाच अनेक राष्ट्रांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना माघारी आणण्यास सुरुवात केली आहे. भारत (India) सरकारनंही यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानातील (Afghanistan) परिस्थिती आणखी चिघळत असतानाच तिथे असणारे राजदूत आणि काही अधिकाऱ्यांसह नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं हालचाली सुरु केल्या. ज्यानंतर 140 जणांना घेऊन एक विमान भारतात आलं. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.

‘तिथे गेलो तर, ठार करतील’, अफगाण स्पेशल फोर्सचा जवान आज दिल्लीत तळतोय फ्रेंच फ्राईज

अफगाणिस्तानात असणारे शीख आणि अल्पसंख्यांक नागरिक यांच्याबाबत प्रशासनानं चिंता व्यक्त केली असून, त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं 'e-Emergency X-Misc Visa'  इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा प्रवेश करु इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांना जलगद गतीनं व्हिसा देण्यात येईल.

अफगाणिस्तानाच अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठीदेशातून सर्वतोपरी मदत केली जात असून अफगान सेलही सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत कोणालाही मदत हवी असल्यास +919717785379 वर फोन किंवा MEAHelpdeskIndia@gmail.com वर ई मेल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या नागरिकांशी केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय संपर्कात असून, त्यांना सुरक्षित स्थळी राहण्यास सांगण्यात आलं आहे. शिवाय भारतात येण्यास उच्छुक असलेल्या नागरिकांचाही विचार केला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये कमर्शिअल फ्लाईटचा पर्याय उपलब्ध होताच त्या नागरिकांना अफगाणिस्तानातून स्थलांतरित करण्यात येईल.