आता राजकारणाला अलविदा करण्याची वेळ आलेय- गिरीराज सिंह

आता केवळ एकच इच्छा उरली आहे.

Updated: Nov 16, 2019, 10:09 PM IST
आता राजकारणाला अलविदा करण्याची वेळ आलेय- गिरीराज सिंह

पाटणा: वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. ते शनिवारी बिहारमध्ये माजी खासदार निखिल चौधरी यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा गिरीराज सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.

मला माझी मशीद परत पाहिजे; असुद्दीन ओवेसींचं ट्विट

या प्रश्नाला उत्तर देताना गिरीराज सिंह यांनी म्हटले की, माझ्यात आता मुख्यमंत्रीपद भुषविण्याची क्षमता नाही. अयोध्येत राम मंदिर स्थापनेच्यादृष्टीने माझे कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता माझ्यासारख्या लोकांची राजकारणाला अलविदा करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. आता केवळ लोकसंख्या नियंत्रण कायदा मंजूर झाला की मी राजकारणापासून फारकत घेईन, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 

बिहारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीराज सिंह राज्यात सक्रिय झाले आहेत. याठिकाणी एनडीए आणि नितीश कुमार यांच्या 'जदयू'मधील संबंध पूर्वीइतके चांगले राहिलेले नाहीत. अमित शहा यांनी जदयूला जादा जागा सोडत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत जास्ता जागा जिंकल्यास भाजप वेगळ्या मार्गाने जाऊ शकते, असा अंदाजही राजकीय जाणकारांकडून वर्तविला जात आहे.