अनिल अंबानी यांच्याकडून रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा

कालच जाहीर झालेल्या तिमाही निकालात रिलायन्स कम्युनिकेशनला ३०,१४२ कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले होते.

Updated: Nov 16, 2019, 06:20 PM IST
अनिल अंबानी यांच्याकडून रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा title=

नवी दिल्ली: अनिल अंबानी यांनी शनिवारी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत छाया विरानी, रायना करानी, मंजरी कैकर आणि सुरेश रंगाचर यांनीही संचालकपदाचा राजीनामा दिला. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोरी जाहीर केली आहे. 

कालच जाहीर झालेल्या तिमाही निकालात रिलायन्स कम्युनिकेशनला ३०,१४२ कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले होते. कॉर्पोरेट विश्वात व्होडफोन-आयडिया यांच्या तोट्यानंतर एखाद्या कंपनीला झालेला हा सर्वाधिक तोटा आहे. रिलायन्स कम्युनिकेशनने गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत १,११४१ कोटीचा नफा कमावला होता. यानंतर दिवाळखोरी प्रक्रियेतंर्गत कंपनीच्या मालमत्तांची विक्री सुरु झाली होती.  मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी रिलायन्सच्या समभागाचे मूल्य ३.२८ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे या समभागाची किंमत ५९ पैसे इतकी झाली आहे.

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवर ४६,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. मालमत्ता विक्रीतून २५,००० कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, हा प्रयत्न फसला होता. अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे स्पेक्ट्रम विकत घेण्याची तयारी दर्शवली होती.