पंतप्रधान मोदींनंतर भारतीय 'या' व्यक्तीच्या प्रेमात

भारतीयांमध्ये प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

Updated: Sep 27, 2019, 03:34 PM IST
पंतप्रधान मोदींनंतर भारतीय 'या' व्यक्तीच्या प्रेमात

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर आहे. पण तरीही त्याच्या लोकप्रियतेच्या बाबतीत धोनी कोणत्याही खेळाडूपेक्षा मागे नाही. 'यूगोव'च्या अहवालनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींमध्ये महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. 

'यूगोव'कडून (YouGov)हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात ४१ देशांतील ४२ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. या अहवालामध्ये पुरुष आणि महिला या दोन विभागात जगातील सर्वाधिक प्रशंसनीय लोकांची यादी तयार करण्यात आली. अहवालानुसार, भारतीयांमध्ये प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीयांमध्ये मोदी आणि धोनीनंतर तिसऱ्या क्रमांकावर रतन टाटा, चौथ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर पाचव्या तर विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे.

भारतातील प्रशंसनीय महिलांमध्ये मेरीकॉम वरच्या क्रमांकावर आहे. तर जगातील सर्वाधिक प्रशंसनीय महिलांमध्ये मेरीकॉम २५व्या स्थानी आहे. 

भारतीय महिलांमध्ये मेरीकॉमनंतर किरण बेदी, लता मंगेशकर, सुषमा स्वराज, दीपिका पदुकोनचा क्रमांक आहे. टॉप २५ प्रशंसनीय महिलांच्या यादीमध्ये मेरी कॉम एकमेव भारतीय महिला आहेत.

या अहवालानुसार, पंतप्रधान मोदींना १५.६६% एडमायरेशन रेटिंग क्रमांक मिळाला आहे. धोनी ८.५८% क्रमांकासह दुसऱ्या स्थानी आहे. रतन टाटा ८.०२% तिसऱ्या क्रमांक, अमिताभ बच्चन ६.५५% चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर ५.८१% आणि ४.४६% नुसार विराटचा सहावा क्रमांक आहे.

अहवालानुसार, जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुष व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स पहिल्या स्थानी आहेत. त्यानंतर बराक ओबामा, जॅकी चेन, शी जिनपिंग आणि जॅक मा आणि नरेंद्र मोदी सहाव्या क्रमांकावर आहेत.