Agnipath scheme protest : बिहार, हरियाणात हिंसक आंदोलनं, रस्ते, रेल्वेमार्गावर जाळपोळ

बिहारमधील नवादा इथल्या भाजप कार्यालयाला आग, अग्निपथ योजनेला विरोध

Updated: Jun 16, 2022, 02:27 PM IST
Agnipath scheme protest : बिहार, हरियाणात हिंसक आंदोलनं, रस्ते, रेल्वेमार्गावर जाळपोळ title=

Agnipath scheme protest : लष्करात अग्निपथ भरती योजनेला बिहारमध्ये जोरदार विरोध होत आहे. हे लोण आता इतर राज्यातही पसरलं आहे. हरयाणामध्ये गुरूग्राम इथेही या योजनेला मोठा विरोध सुरू झालाय. गुरूग्राममध्ये आंदोलकांनी हायवेवर चक्काजाम आंदोलन केलं.  

बिहारमधील नवादा इथं आंदोलक विद्यार्थ्यांनी भाजपच्या कार्यालयाला आग लावली. बिहारमध्ये अनेक भागात तरूणांनी मोर्चे काढले तसंच जाळपोळही केलीय. कालपासूनच बिहारमध्ये या विरोधाला सुरूवात झालीय. बिहारच्या मुंगेर, सफियासराय, जहानाबाद, बक्सर, आराह, भभुआ भागात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आंदोलकांनी जहानाबादमध्ये राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ केली. 

काही भागात रेलरोकोही करण्यात आलाय. केंद्र सरकारविरोधात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. बक्सर, मुजफ्फरपूरमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी जोरदार दगडफेकही करण्यात आली. बक्सर स्टेशनवरून जाणाऱ्या पाटलीपूत्र एक्स्प्रेसवर आंदोलकांनी दगडफेक केली. 

दोन वर्षांपासून झालेल्या भरती परीक्षांमधील उमेदवारांनाही आता याच स्कीम अंतर्गत सेवेत घेतलं जाणार आहे अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे तरूणांमध्ये रोष आहे. लष्कर भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांमध्ये अग्निपथबाबत कमालीचा असंतोष आहे.

बिहारमध्ये अग्निपथ भरती योजनेविरोधात उद्रेक कमालीचा पेटला.  छपराजवळ भभुआ स्टेशनवर संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी ट्रेन जाळली. शेकडो आंदोलनकर्त्यांनी भभुआ स्टेशनवर हल्लाबोल करत स्टेशनवर मोडतोड केली, तसंच स्टेशनवर उभी असलेली पाटना भभुआ इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लावली.