श्रीनगर : Viral News: काहीवेळा छोटे छोटे उंदीर मोठी मोठी कामं बिघडवतात. तुम्ही कधी विचार केला आहे की छोट्या उंदरामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब होऊ शकतो? फक्त एका उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाला. टाटा समूहातर्फे संचालित एअर इंडियाचे श्रीनगर-जम्मू विमान गुरुवारी विमानात उंदीर दिसल्याने सुमारे दोन तास उशिराने निघाले.
उंदरामुळे विमानाला उशीर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमान वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानातून उंदीर काढल्यानंतरच विमानाने श्रीनगर विमानतळावरून उड्डाण घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, या घटनेमुळे जवळपास दोन तासांचा विलंब झाला.
DGCAने माहिती दिली की, फ्लाइट क्रमांक AI822 ची नियोजित सुटण्याची वेळ दुपारी 2.15 वाजता होती, परंतु ती 4:10 वाजता निघाली.
वृत्तसंस्थेने या प्रकरणी एअर इंडियाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.