काँग्रेसचा 'हात' बळकट करण्यासाठी आता प्रशांत किशोर यांची 'ब्लू प्रिंट'

Prashant Kishor's Blue Print : काँग्रेसला (Congress) पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी आता राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेसला संपू देणार नाही, असा निर्धार केला आहे.  

Updated: Apr 22, 2022, 12:02 PM IST
काँग्रेसचा 'हात' बळकट करण्यासाठी आता प्रशांत किशोर यांची 'ब्लू प्रिंट' title=

मुंबई : Prashant Kishor's Blue Print : काँग्रेसला (Congress) पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी आता राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेसला संपू देणार नाही, असा निर्धार केला आहे. काँग्रेसचे 'हात' बळकट करण्यासाठी 'ब्लू प्रिंट' आणणार आहेत. भारतीय राजकारणात राष्ट्रीय काँग्रेसला मरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. काँग्रेसचा विचार देशातून मरु शकत नाही, असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. (Congress New President Election) अशा परिस्थितीत काँग्रेसने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी याबाबतचे सादरीकरणही केले होते. काँग्रेसने ते मान्य करुन प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान, प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी हालचाली

काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. यामध्ये राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनितीबाबत पक्षात विचारविनिमय सुरु आहे. काँग्रेसचे अस्तित्व चिरकालीन आहे, ते संपू देणार नसल्याचे किशोर म्हणाले. दरम्यान, प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली आहे. यामध्ये त्यांनी रणनितीबाबत सादरीकरण देखील दिले आहे. हीच त्यांची 'ब्लू प्रिट' असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसला पराभवाचे धक्के बसत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवला सामोरे जाव लागले होते. त्यानंतर पक्षाची ताकद कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश देखील केला होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. या पाचपैकी पंजाब हे एकमेव काँग्रेसच्या हाती असलेल्या राज्यात देखील काँग्रेसला धक्का बसला आहे. त्याठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्या आपने सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी ब्लू प्रिंट दिल्याची माहिती देखील मिळत आहे.

सदस्यत्व मोहीम  

प्रशांत किशोर यांच्या ब्ल्यू प्रिंटनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती बिनविरोध निवडून करावी, असे ठरले. आता काँग्रेस प्रशांत किशोर यांच्या सुधारणा प्रस्तावावर विचार करत आहे. संघटनात्मक निवडणुकीसाठी पक्ष सज्ज झाला आहे. यासाठी 6 कोटींहून अधिक काँग्रेस सदस्यांनी नोंदणी केली आहे. काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, पक्षाने सदस्यत्व मोहीम पूर्ण केली आहे.

डिजिटल माध्यमातून 2.6 कोटी नामांकन

ते म्हणाले की डिजिटल माध्यमातून सुमारे 2.6 कोटी सदस्यांची नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणी ऑफलाइन करण्यात आली. आणखी काही दिवसांत एकूण संख्या निश्चित होईल. 15 एप्रिलपर्यंत ज्या सभासदांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे त्यांना संस्थेच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार असेल. मिस्त्री म्हणाले की, पक्षाच्या निवडणुका प्राथमिक स्तरापासून सुरू होतील आणि त्यानंतर बूथ कमिटीच्या निवडणुका, ब्लॉक, जिल्हा आणि राज्यस्तरीय निवडणुका होतील.