राफेलच्या स्वागतासाठी देश सज्ज; आज अंबाला एअरबेसवर होणार दाखल

भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता.

Updated: Jul 29, 2020, 10:50 AM IST
राफेलच्या स्वागतासाठी देश सज्ज; आज अंबाला एअरबेसवर होणार दाखल

नवी दिल्ली : आज लढाऊ राफेल विमान भारतात दाखल होणार आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया या विमानांच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. आज म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता अबु धाबीवरुन राफेलचं उड्डाण होणार असून दुपारी जवळपास 2 वाजता, पाच राफेल विमान हरियाणातील अंबाला एअर बेसवर पोहचणार आहेत. अंबाला विमानतळ आणि आसपासच्या परिसरातील अनेक भागात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

अंबाला एअरफोर्स स्टेशन राफेलचं पहिलं स्क्वाड्रन बनवण्यात आलं आहे. राफेल फायटर जेटसाठी अंबाला जिल्हा प्रशासनाने एअरबेसपासून जवळपास 3 किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू केला आहे. त्याशिवाय एअरबेसजवळ ड्रोन उडवण्यास आणि फोटोग्राफीसाठीही बंदी आहे.

भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी करार केला होता. हा करार जवळपास 59000 कोटी रुपये इतका होता. या लढाऊ विमानांच्या करारानंतर आज पहिल्यांदा पाच राफेल भारतात पोहचणार आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय वैमानिकच या विमानाचं उड्डाण करुन ते भारतात आणणार आहेत. फ्रान्समधून उड्डाण केल्यानंतर विमान यूएईच्या अल डाफरा एअरबेस पोहचून त्यानंतर आता भारतात येणार आहे.