Youth Gets Bitten To Death: सेल्फी हा ट्रेण्ड आजच्या स्मार्टफोनच्या जगात फारच सामान्य झाला आहे. अनेकदा सेल्फीच्या नादात लोक जीव धोक्यात टाकत असल्याचंही दिसून आलं आहे. जीव धोक्यात टाकून सेल्फी काढतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अगदी दरीजवळ डोंगरकड्यावर उभा राहून काढलेला सेल्फी ते बाईक अथवा कार वेगाने चालवत असल्याचे सेल्फी आणि त्यानंतर घडलेला अपघात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सापडतील. अनेकांना तर जीवघेण्या आणि धोकादायक प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह सुद्धा आवरत नाही. अशाच प्रकारे एका सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवाशी बेतल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
आंध्र प्रदेशमधील कंदुकूर शहरामध्ये एक गारुड्या बस स्थानकावर सापाचे खेळ दाखवत होता. यावेळी तिथं हे खेळ पाहणारा मणिकांता रेड्डी नावाचा तरुण थक्क झाला. साप पाहून आपण हा साप गळ्यात टाकून सेल्फी काढावा असा मणिकांताने विचार केला. भन्नाट सेल्फी काढण्याच्या नादात या तरुणाने साप आपल्या गळ्यात गुंडळला. या सापाबरोबर खेळताना या तरुणाला मजा येत होती. ज्युस सेंटरवर हेल्पर म्हणून काम करणाऱ्या मणिकांताला साप गळ्यात असतानाच सेल्फी काढायचा होता. त्याने फोटो काढलाही.
मात्र हा साप गळ्यातून काढताना सापाने मणिकांताच्या गळ्याला चावा घेतला. घडलेला प्रकार पाहून बस स्थानकावर एकच खळबळ उडाली. हा सारा प्रकार पाहणाऱ्या लोकांनी या तरुणाला साप चावल्यानंतर त्याला ओंगोले येथील रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचं ठरवलं. मात्र रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला. मणिकांताचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे हा सारा खेळ पाहणाऱ्यांना धक्का बसला असून चूक कोणाची यावर चर्चा सुरु झाली आहे. कोणतेही प्रशिक्षण नसताना अशाप्रकारे साप हातळण्याची मागणी करणारा मणिकांता की त्याला असं करु देणारा गारुडी यावरुन स्थानिकांमध्ये चर्चा सुरु आहे. नागुलुरी स्वामी (30) असं या गारुड्याचं नाव असून त्याने मणिकांतला हा साप विषारी नसून त्याचे दात काढण्यात आले आहेत असं तो म्हणाला होता. मणिकांताना साप गळ्यात घालण्याची इच्छा व्यक्त केली असता सेल्फीसाठी या गारुड्याने हा साप मणिकांताच्या गळ्यात घातला. मात्र तो घालताना पहिल्यांदा साप खाली पडला. त्यामुळे तो गारुड्याने पुन्हा उचलला आणि मणिकांताच्या गळ्यात घातला. एवढं होऊनही साप शांत आहे हे पाहून मणिकांता निर्धास्त झाला आणि इथेच त्याची चूक झाली. साप स्वत:च्या हाताने गळ्यातून काढताना तो मणिकांताला चावला. त्यामुळे आता गारुड्यावर कारवाई कारवी अशी मागणीही केली जात आहे.