Reliance Capital Ltd: रिलायन्स उद्योग (Reliance Group) समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू, अनिल अंबानी (Anil Amabani) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (Reliance Capital Ltd.) ही कंपनी इनसॉल्वेंसी आणि दिवाळखोरीच्या वाटेवरून आता पुढे आली आहे. असं असतानाच आता त्यांच्यापुढे अडचणींचा आणखी एक डोंगर उभा ठाकला आहे. कारण, अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीचीसुद्धा (Reliance General Insurance Company) वाईट अवस्था असल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी रिलायन्स जनरल इंश्युरन्सनं कर्जात बुडालेल्या मूळ रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपनीकडून पुढील कामकाज मार्गी आणण्यासाठी 600 रुपयांची कर्जाऊ रक्कम मागितली आहे.
सध्या मदतीसाठी अंबानींकडून रिलायन्स कॅपिटल अॅडमिनिस्ट्रेटरना लिहिलेल्या पत्रात आरजीआईसी (RGIC) कडून या महिन्याच्या अखेरपर्यंत 600 कोटी रुपयांचा मदत निधी मागण्यात आला आहे. याच धर्तीवर कर्जदात्यांची एक समिती सदरील मागणीबाबत एका बैठकीत चर्चा करणार आहे.
कोणकोणत्या कंपन्यांनी लावली बोली?
या क्षणाला कंपनीसाठी ओकट्री, कोस्मिया-पीरामल गठजोड़, हिंदुजा अँड टॉरेंट समूह यांच्याकडून बोली लावण्यात आली आहे. आरजीआईसी (RGIC) च्या सांगण्यानुसार व्यवसाय पुढे सुरु ठेवण्यासाठी आणि कंपनीची सॉल्वेंसी रक्कम 155 वरून 175 टक्क्यांवर आणण्यासाठी त्यात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तेव्हा आता याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी की, या नॉन लाइफ इंन्श्युरन्स कंपनीमध्ये 7 हजारांहून जास्त कर्मचारी 70 लाखांहून इतर ग्राहकांची गुंतवणूक आहे. त्यामुळं आता या संपूर्ण परिस्थितीवर याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.