मोदींनी उद्घाटन केलेल्या उड्डाणपुलाचे केले पुन्हा लोकार्पण

अनुप्रिया पटेल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून या पुलावरील चारचाकी वाहनांची वाहतूक थांबवली होती.

Updated: Aug 5, 2018, 01:16 PM IST
मोदींनी उद्घाटन केलेल्या उड्डाणपुलाचे केले पुन्हा लोकार्पण title=

लखनऊ: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील खासदार अनुप्रिया पटेल सध्या चर्चेत आल्या आहेत. यासाठी एका उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा कारणीभूत ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले होते. मात्र, आता अनुप्रिया पटेल यांनी पुन्हा या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याची कामगिरी करुन दाखविली आहे. 

उत्तर प्रदेशातील मीरजपूर येथे हा उड्डाणपूल आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार अनुप्रिया पटेल यांनी एकदा उद्घाटन झालेल्या या पुलाचे लोकार्पण करण्याचा पुन्हा घातला. मात्र, हा पूल आता चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आल्याने त्याचे नव्याने लोकार्पण केल्याचे स्पष्टीकरण अनुप्रिया पटेल यांनी दिले. परंतु, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अनुप्रिया पटेल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून या पुलावरील चारचाकी वाहनांची वाहतूक थांबवली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर या पुलावर चारचाकी वाहनांना प्रवेश देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

अनुप्रिया पटेल यांच्या या कृतीमुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत. यापूर्वी उद्घाटनाच्यावेळी अनुप्रिया पटेल यांनी भाजपला मदत करण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. हा भाजपचा कार्यक्रम आहे. त्यामुळे पटेल यांनी आपल्या समर्थकांनाही कार्यक्रमाला न जाण्याविषयी बजावले होते. अखेर भाजपने खासदार वीरेंद्र सिंह यांना कार्यक्रमाच्या तयारीसाठी मीरजपूर येथे पाठवले होते.