जम्मू कश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरू

जम्मू काश्मीरमध्ये रमजानचा महिना संपल्यानंतर भारतीय सैनिकांनी पुन्हा ऑपरेशन ऑलऑऊट सुरू केलंय.

Updated: Jun 18, 2018, 02:35 PM IST
जम्मू कश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरू

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये रमजानचा महिना संपल्यानंतर भारतीय सैनिकांनी पुन्हा ऑपरेशन ऑलऑऊट सुरू केलंय. दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. घाटीतील बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सैनिकांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. सेना आणि दहशतवाद्यांमध्ये घनदाट जंगलात सुरू असलेल्या चकमकीत एअर फोर्सही सैनिकांची मदत करत आहे.

सीजफायर संपली 

 सीजफायर संपल्याची घोषणा रविवारी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. सर्वसाधारण माणस रमझानच्या पवित्र सणाचा आनंद घेऊदेत यासाठी सीजफायर लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पण दहशतवाद्यांवर याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी या संधीचा फायदा घेत दहशतवादी हल्ले केले. घाटीमध्ये दहशतवादमुक्त आणि शांतियुक्त वातावरण प्रस्थापित करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले.

रमजानमध्येही दहशतवाद 

ईदच्या एक दिवस आधी रायजिंग काश्मीरचे संपादक आणि पत्रकार शुजात बुखारी यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. बुखारी यांचे दोन सुरक्षारक्षकही यामध्ये मारले गेले. तसेच ईदच्या सुट्टीसाठी घरी येत असलेल्या सेना जवान औरंगजेब याचीही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दहशतवाद्यांविरूद्ध लोकांच्या मनात असंतोष आहे.