महाराष्ट्रापेक्षा कोरोनावरील उपाययोजनांवर दिल्ली सरकार 'एक पाऊल पुढे'

दिल्लीत कोरोनाचे 6 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण हे भारतीय आहेत. तरी देखील दिल्ली सरकारने याला मोठ्या गंभीरतेने घेतलं आहे.

Updated: Mar 12, 2020, 06:44 PM IST
महाराष्ट्रापेक्षा कोरोनावरील उपाययोजनांवर दिल्ली सरकार 'एक पाऊल पुढे'

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचे 6 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण हे भारतीय आहेत. तरी देखील दिल्ली सरकारने याला मोठ्या गंभीरतेने घेतलं आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाला साथ असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे दिल्ली प्रशासन यावर सर्वतोपरी काळजी घेत आहे. 31 मार्चपर्यंत दिल्लीतील थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

याशिवाय शाळा कॉलेजेसमधील परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत. तसेच शाळा कॉलेजेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. 

कोरोना संशयित आणि बाधितांना वेगळं ठेवण्यासाठी दिल्ली अर्बन शेलटर इम्प्रुव्हमेंट बोर्डची रिकामी असलेले फ्लॅट वापरण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. 

कोरोना बाधित संशयित तसेच रूग्ण यांचं विलगिकरण करण्यासाठी हे फ्लॅट वापरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात सध्या 11 कोरोना बाधित रूग्ण आहेत, त्यात मुंबईत 2 आणि पुण्यात 8 रूग्ण आहेत. 

दिल्लीत पुण्यापेक्षा कमी रूग्ण असतानाही केजरीवाल सरकारने एक पाऊल पुढे टाकत अधिक खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे.