Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान त्यांच्या या विधानावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
मोहन भागवत यांच्या विधानावर व्यक्त होताना ओवेसी म्हणाले की, "जसं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतात, तसंच मोहन भागवतांनी हेदेखील सांगायला हवं की, जर कोणी जास्त मुलं जन्माला घातली तर त्यांच्या खात्यात आम्ही इतके पैसे टाकू. मोहन भागवतांनी असं बोलायला हवं होतं की, जे जास्त मुलं जन्माला घालतील त्यांच्या खात्यात 1500 किंवा 2000 रुपये टाकू. त्यांनी अशी योजनाच काढायला हवी होती". पुढे ते म्हणाले की, "अल्लाहच्या कृपेने माझी 6 मुलं आहेत. नरेंद्र मोदीही सहा भाऊ-बहीण आहेत. अमित शाहदेखील सहा भाऊ-बहीण आहेत".
"हे नरेंद्र मोदींना जाऊन शिकवलं पाहिजे ज्यांनी मुस्लीम जास्त मुलं जन्माला घालतात असं म्हटलं होतं," असा टोलाही त्यांनी लगावला.
Nagpur, Maharashtra | RSS chief Mohan Bhagwat says, "The decline in population is a matter of concern. Modern population science says that when the population (fertility rate) of a society goes below 2.1, that society vanishes from the earth. That society gets destroyed even when… pic.twitter.com/05fuy2dVKs
— ANI (@ANI) December 1, 2024
नागपुरात कठाळे कुल संमेलनाला मोहन भागवत यांनी हजेरी लावली. या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी भाषण कऱणाऱ्यांनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही अशी चिंता व्यक्त केली. यानंतर सरसंघचालकांनी हा मुद्दा पुढे नेला. ते म्हणाले, "नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो. तो समाज जगाच्या पाठीवर नसतो. त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत".
"आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 1998- 2002 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की, 'लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये," अशी आठवण त्यांनी करुन दिली. लोकसंख्या शास्त्रानुसार दोन किंवा तीन पेक्षा जास्त अपत्य असावीत असं भागवत म्हणाले आहेत.
ओवेसी यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षाने केलेल्या कामगिरीवरही भाष्य केलं. "आम्ही लढवलेल्या सर्व जागांवर आमचा मतांचा वाटा खूप चांगला होता. आम्ही आमच्या उणिवा दूर करून पुढे जाण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करू." मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही ओवेसींनी आपली बांधिलकी व्यक्त करताना सांगितले की, मराठा आरक्षणासाठी आम्ही आवाज उठवत राहू आणि हीच आमची बांधिलकी आहे.