सिंह कोण आणि कुत्रा कोण; सरसंघचालकांच्या 'त्या' वक्तव्यामुळे ओवेसी भडकले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाची घटनाच मान्य नाही.

Updated: Sep 9, 2018, 04:18 PM IST
सिंह कोण आणि कुत्रा कोण; सरसंघचालकांच्या 'त्या' वक्तव्यामुळे ओवेसी भडकले title=

हैदराबाद: सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिकागो येथील धर्म संसदेत केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे. या भाषणादरम्यान मोहन भागवत यांनी हिंदुंनी एकत्र येण्याची गरज बोलून दाखविली होती. सिंह एकटा असेल तर कुत्रेही त्याच्यावर हल्ला करून त्याला मारू शकतात, असे उदाहरण भागवतांनी दिले होते. 

या विधानावर एमआयएम पक्षाचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटले की, कोण कुत्रा आहे आणि कोण सिंह आहे, भागवतांनी स्पष्ट करावे. भारतीय घटनेने प्रत्येकाला माणसाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे कोणाचीही तुलना सिंह किंवा कुत्र्याशी करणे योग्य नाही. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाची घटनाच मान्य नाही. अशी विधाने करून संघाला लोकांचे खच्चीकरण करायला आणि स्वत:ला वाघ म्हणून घ्यायला आवडते, असे ओवेसींनी सांगितले. 

शिकागोतील मोहन भागवतांच्या भाषणावेळी हिंदू समाजातील जवळपास २५०० नेते उपस्थित होते. अहंकाराला वेसण घातली आणि सर्वानुमतीने गोष्टी स्वीकारल्या तर संपूर्ण जगाला एकत्र आणता येणे शक्य आहे. सिंह एकटा असेल तर कुत्रेही त्याच्यावर हल्ला करुन त्याला ठार मारू शकतात. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला हे जग आणखी चांगले करायचे आहे. हिंदुंमध्ये वर्चस्ववादाची भावना नाही, असे भागवतांनी म्हटले होते.