सासू सासऱ्यांसह पत्नीची हत्या करुन मुलाला कडेवर घेऊन पोलिसांत पोहोचला; समोर आलं धक्कादायक कारण

Assam Crime : आसाममधील गोलहाट जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड समोर आली आहे. नजीबुर रेहमान बोरा (25) याने पत्नी आणि सासू सासऱ्यांची हत्या केली आहे. यानंतर तिने नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला हातात घेऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 

आकाश नेटके | Updated: Jul 26, 2023, 03:41 PM IST
सासू सासऱ्यांसह पत्नीची हत्या करुन मुलाला कडेवर घेऊन पोलिसांत पोहोचला; समोर आलं धक्कादायक कारण title=

Crime News : आसामच्या (Assam Crime) गोलाहातमध्ये तिहेरी हत्याकांडाची (assam triple murder case) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी एका व्यक्तीने पत्नी, सासू आणि सासऱ्याची हत्या केली आहे. तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या मुलासह फरार झाला होता. मात्र, घटनेच्या काही तासांनंतर आरोपीने त्याच्या अल्पवयीन मुलीसह पोलीस ठाण्यात (Assam Police) आत्मसमर्पण केले. आरोपीने आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती गोलाघाट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पुष्किन जैन यांनी दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

पत्नी आणि सासू सासऱ्यांची केली हत्या

आसाममधल्या या हत्याकांडाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नजीबुर रहमान नावाच्या आरोपी पतीने पत्नी संघमित्रा आणि सासू सासऱ्यांची चाकूने वार करुन हत्या केली आहे. पत्नी आणि सासू सासऱ्यांना ठार मारल्यानंतर आरोपीने मुलासह पोलीस ठाणे गाठत आत्मसमर्पण केले आहे. गोलाहाटच्या हिंदी स्कूल रोडवर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी नजीबुरने सासरे संजीब घोष, सासू जुनू घोष आणि पत्नी संघमित्रा घोष यांची हत्या केली होती.

कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या

या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी आता सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, गोलाहतचे एसपी म्हणाले की, हत्या निव्वळ कौटुंबिक आहे. आरोपीने सोमवारी दुपारी पत्नी, सासू आणि सासरे यांची हत्या करून मृतदेह घरात फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये वैवाहिक वाद सुरू होता. त्यामुळेच त्याने हा गुन्हा केला आहे.

लॉकडाऊनमधलं प्रेम आणि पळून जाऊन लग्न

व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या नजीबुर रहमानने जून 2020 मध्ये संघमित्रासोबत फेसबुकवर मैत्री केली होती. त्यानंतर कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. याच दरम्यान, दोघांमधील प्रेम इतके वाढले की ऑक्टोबर 2020 मध्येच दोघे कोलकात्याला पळून गेले होते. त्यानंतर नजीबुर आणि संघमित्रा घोष यांनी कोलकाता येथे कोर्ट मॅरेज केले. मार्च 2021 मध्ये, संघमित्रा घोषच्या पालकांनी मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिने घरातून चोरी केल्याचा आरोप केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संघमित्रा घोषला अटक केली. संघमित्रा सुमारे 37 दिवस न्यायालयीन कोठडीत होती. जामीन मिळाल्यानंतर ती पुन्हा आई-वडिलांसोबत राहू लागली.

जानेवारी 2022 मध्ये, आरोपी आणि संघमित्रा पुन्हा एकदा चेन्नईला पळून गेले आणि तेथे 5 महिने राहिले. त्याच दरम्यान संघमित्रा गरोदर राहिली. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये ते गोलाहातला परतले आणि नजीबुरच्या घरी राहू लागले. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर मार्च 2023 मध्ये, दोघांमध्ये वाद झाल्याने संघमित्राने नजीबुरचे घर सोडले आणि तिच्या पालकांकडे परत आली. नजीबुर आपल्यावर अत्याचार करत होता, असे तिने पालकांना सांगितले. यानंतर संघमित्राच्या कुटुंबीयांनी मार्च 2023 मध्ये गोलाहात पोलीस ठाण्यात नजीबुरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी नजीबुरला अटक केली आणि 28 दिवसानंतर त्याला जामिनावर सोडले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर नजीबुरने पत्नी आणि मुलाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यानंतर सोमवारी नजीबुरने संघमित्रासह सासू सासऱ्यांची हत्या केली.