कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अॅपवरुन बूक केलेली राईड रद्द केल्यानंतर रिक्षाचालकाने महिलेचा पाठलाग करत तिला मारहाण केली. यादरम्यान त्याने तिला घाणेरड्या शिव्यादेखील दिल्या. महिला व्हिडीओ रेकॉर्ड करु लागल्यानंतर आरोपी तिला धमकावू लागला होता. पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली असून रिक्षाचालकाविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने सांगितलं की बुधवारी तिे आणि तिच्या मित्राने ओला अॅपवरुन पीक अव्हर्समध्ये दोन ऑटो बूक केल्या होत्या. यावेळी मित्राची ऑटो आधी आल्याने महिलेने तिची ऑटो राईड रद्द केली.
ऑटो राईड रद्द केल्याने संतापलेल्या चालकाने त्यांचा पाठलाग केला. त्याला परिस्थिती समजावून सांगितल्यानंतरही तो ओरडू लागला. त्याने महिलेला शिवीगाळ केली आणि रिक्षात घुसून तिच्याशी असभ्यपणे वागू लागला. रिक्षा तुझ्या बापाची आहे का? अशा शब्दांत त्याने महिलेशी वाद घातला. यादरम्यान त्याने अनेक असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. पीडित महिला व्हिडीओ रेकॉर्ड करु लागल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाने धमकी देत मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न केला.
Yesterday I faced severe harassment and was physically assaulted by your auto driver in Bangalore after a simple ride cancellation. Despite reporting, your customer support has been unresponsive. Immediate action is needed! @Olacabs @ola_supports @BlrCityPolice pic.twitter.com/iTkXFKDMS7
— Niti (@nihihiti) September 4, 2024
महिलेने सांगितलं की, तिने विरोध केला असता रिक्षाचालकाने सर्वांसमोर तिच्या कानाखाली लगावली. यानंतर चपलेनेही हल्ला केला. यादरम्यान आजुबाजूला उभे लोक फक्त तमाशा पाहत होते. पीडितेने सोशल मीडियावर घटनेचा उल्लेख करत हे फार भीतीदायक असल्याचं सांगितलं. महिलेने पोस्टमध्ये कंपनीलाही टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना हे फार चिंताजनक असून, घटनेची चौकशी करु असं म्हटलं आहे. दरम्यान घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी महिलेला योग्य कारवाईचं आश्वासन दिलं आहे. महिलेच्या पोस्टवर व्यक्त होताना ते म्हणाले आहेत की, "असं वागणं स्विकारलं जाऊ शकत नाही. अशा काही लोकांमुळे सर्व रिक्षाचालकांचं नाव खराब होतं. आरोपी चालकाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत".