लेकीला Officer बनवण्यासाठी रिक्षा चालक वडिलांचे असेही प्रयत्न; पाहून द्याल कडक सॅल्युट

लेकरांसाठी पालक बऱ्याचदा असं काही करतात, की आयुष्यभर कितीही गोष्टी मिळवल्या तरी त्यांचे ऋण फेडता येत नाहीत.   

Updated: Oct 14, 2022, 08:40 AM IST
लेकीला Officer बनवण्यासाठी रिक्षा चालक वडिलांचे असेही प्रयत्न; पाहून द्याल कडक सॅल्युट  title=
auto driver viral for taking online lesson to help daughter for upsc exam preparation

UPSC Exams : मुलं मोठी होतात तसतसं आईवडीलही मोठे होत असतात. त्यांनाही नवनवीन गोष्टी काळाच्या ओघात माहिती पडू लागतात आणि एका वळणावर याच मुलांसाठी पालक जगू लागतात. मुलाबाळांनी आयुष्यात सर्व स्वप्न पूर्ण करावीत, यश मिळवावं आणि सुखी आयुष्य जगावं अशीच त्यांच्या मनातील कामना असते. फक्त इतकंच नाही, तर लेकरांच्या सुखासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी आई-वडील अगदी काहीही करु शकतात. अपार मेहनतीत ते कुठेही कमी पडत नाहीत पण, त्यासोबतच लेकरांसाठी ते बऱ्याचदा असं काही करतात, की आयुष्यभर कितीही गोष्टी मिळवल्या तरी त्यांचे ऋण फेडता येत नाहीत. 
 
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमुळे आईवडील त्यांच्या मुलांसाठी किती मेहनत घेतात याची अगदी सहजपणे प्रचिती येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Linkd in) लिंक्डइनवर अभिजीत मुथा नावाच्या एका युजरनं पोस्ट लिहित रिक्षाचालकाचा फोटो पोस्ट केला. 

अधिक वाचा : भारताची भीती की आणखी काही? कोहिनूर हिऱ्याबाबत British Royal Family चा मोठा निर्णय 

 

पोस्ट अगदी लहान असलं तरीही त्यामधून समोर आलेलं वास्तव अनेकांनाच परिस्थितीची जाणिव करुन देणारं ठरलं. अभिजीतनं आपला अनुभव शेअर करताना लिहिलं, 'काल मी जेव्हा उबर (uber) बुक केली जेव्हा राकेश नावाचा चालक मला घेण्यासाठी आला. राईड सुरु झाली तेव्हा त्यानं युट्यूब व्हिडीओ (You tube) थांबवत नॅव्हिगेशन सुरु केलं. थोड्या वेळानं त्यानं पुन्हा तोच व्हिडीओ सुरु केला.'

रिक्षा चालक नेमका कोणता व्हिडीओ पाहतोय याची उत्सुकता या Passanger लाही होती. शेवटी राहावलं नाही आणि त्यानं तुम्ही काय पाहताय? असा प्रश्न विचारला. रिक्षा चालकानं उत्तर दिलं, ताज्या घडामोडी आणि अर्थव्यवस्थेविषयी माहिती देतात यामध्ये. 

चालक हे सर्व ऐकतोय, पाहतोय हे लक्षात येताच तुम्ही कोणती परीक्षा देताय का असा प्रश्नही त्यानं (प्रवाशानं) विचारला. यावर त्यानं जे उत्तर दिलं ते पाहून या रिक्षा चालकाचं कौतुक करावं तितकं कमी असंच या Linkdin User ला वाटलं. 

माझी मुलगी UPSC ची तयारी करतेय. त्यामुळं मीपण तिला थोडी मदत करतो. सायंकाळी ती ग्रंथालयातून येते तेव्हा आम्ही अशी (घडामोडींविषयी) चर्चा करतो, असं सांगत लेकिला थोडीथोडकी मदत आपणही करत असल्याचं नकळतपणे त्या रिक्षा चालकानं सांगितलं. 

मुलगी घेत असणारी मेहनत अद्वितीय आहेच पण, तिला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या या रिअल लाईफ Superman ला सध्या नेटकरी सलाम करत आहेत.