हल्ल्यानंतरही काश्मिरी नागरिकांसाठी सीआरपीएफ ठरतंय 'मददगार'

काश्मिरी नागरिकांच्या मदतीसाठी उचललं हे पाऊल... 

Updated: Feb 17, 2019, 09:04 AM IST
हल्ल्यानंतरही काश्मिरी नागरिकांसाठी सीआरपीएफ ठरतंय 'मददगार' title=

श्रीनगर : Pulwama Attack काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना पुलवामा हल्ल्यानंतर समाजाच्या रोषाचा सामना करावा लागू नये किंवा त्यांच्यापुढे अशी अडचणीची परिस्थिती उदभवलीच तर, त्यांच्या मदतीसाठी म्हणून सीआरपीएफकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना या हल्ल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच श्रीनगरस्थित सीआरपीएफकडून शनिवारी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं. शनिवारी त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सीआरपीएफच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून या अनुचित प्रकारांची माहिती देत मदत मिळवता येऊ शकते. 

सीआरपीएफ मददगारकडून ट्विटरवर याविषयीची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये राज्याबाहेर असणारे काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिक या ट्विटर हँडलच्या माध्यमातूनही मदत मिळवू शकतात अशी माहिती दिली. 

मदतीसाठीचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक (चोवीस तास सेवा)- १४४११
किंवा मेसेज करण्यासाठीचा मोबाईल क्रमांक- 7082814411

या क्रमांकांवर (चोवीस तास सुरू असणाऱ्या सेवा) संपर्क साधतच कोणत्याही प्रकारच्या छळवणूकीविषयीची माहिती देत काश्मिरी नागरिकांना सहज मदत मिळणार आहे.

याविषयीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रमांकावर कोणाच्या तक्रारी आल्यास त्यावर लगेचच कारवाई सुरू करण्यात येणार आहे. आम्ही आमचे जवान गमावले आहेत. तरीही आम्ही ही प्रतिज्ञा घेतो की काश्मिरी खोऱ्यात राहणाऱ्यांच्या बाजूने सीआरपीएफ नेहमीच उभी असेल. आमचा त्यांना आधार असेल', असंही ते म्हणाले. 

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील नागरिक आणि विद्यार्थ्यांना समाजातील अतर वर्गांकड़ून रोषाचा सामना करावा लागत असल्याच्या घटनांविषयीची माहिती समोर आली होती. त्यामुळेच गृहमंत्रालाकडून सर्व राज्यांना यावर तातडीने कारवाई करण्याची विचारणा करण्यात आली.

'झी न्यूज'च्या वृत्तानुसार उत्तराखंडच्या देहरादून येथे राहणाऱ्या काही विद्यार्थांकडून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळाली होती. त्या विद्यार्थ्यांच्या घरमालकाने त्यांना घरातून निघून जाण्यास सांगितलं होतं. ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी 'मददगार' खऱ्या अर्थाने काश्मिरी नागरिकांच्या हाकेला धावून आलं.